माऊली … माऊलीचा जयघोष करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या जगद्गुरु संतश्रेष्ठ संत श्तुकाराम महाराजांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आज ४ च्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. या सोहळ्याचे स्वागत महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले. पालखीचा आजचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात असणार आहे. भक्ती शक्ती चौक मार्गे पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाली.
निगडी येथील भक्ती शक्ती चौकात झालेल्या या स्वागत सोहळ्याला अतिरिक्त आयुक्त अण्णा बोडदे, शहर अभियंता मकरंद निकम, शहर अभियंता प्रमोद ओंभासे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदींनी दिंडी प्रमुखांचा सत्कार केला.
यावर्षी दिंडी प्रमुखांना कापडी पिशवी, प्रथमोपचार पेटी, संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका तसेच झाडांच्या बिया, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वृक्षारोपण, वृक्षदिंडी, हरीतवारी असे विविध उपक्रम देखील महापालिकेच्या वतीने राबविण्यात आले.
आषाढीवारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली. आकुर्डी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदीरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामासाठी विसावला आहे.
I’m दिंड्यांच्या मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये असतो तसेच इतर खाजगी ठिकाणी असतो तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पुरेसे शौचालय, स्नानगृह, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.