Thursday, January 16, 2025
Homeताजी बातमीविरोधकांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना घेरलं..! सत्तार, सामंत, राठोडांच्या नावाने शिमगा, मुख्यमंत्र्यानाही केले...

विरोधकांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना घेरलं..! सत्तार, सामंत, राठोडांच्या नावाने शिमगा, मुख्यमंत्र्यानाही केले लक्ष्य…

विरोधी पक्षाला अधिवेशनात सूर गवसत नसल्याचा आरोप होत होता. मात्र मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एनआयटी घोटाळ्याचे आरोप करुन विरोधकांनी अधिवेशाला झोकात सुरुवात केली. या आठवड्यात तर शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप करुन त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी मजबूत फिल्डिंग लावल्याने विरोधक अधिवेशात फ्रंटफूटवर असल्याचं चित्र आहे. तर एकमागून एक घोटाळ्याचे आरोप होत असल्याने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन मात्र वाढलं आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने सरकारविरोधात ‘टाळ कुटो व दिंडी आंदोलन’ करीत सत्ताधाऱ्यांचा धिक्कार केला. भूखंड घ्या.. कुणी गायरान घ्या.. खोक्यानं घ्या.. कुणी खोऱ्यानं घ्या.., कुणी गुवाहाटीला जा कुणी सुरतला जा.. असे अभंग गात सत्ताधारी पक्षाविरोधात सूर आळवला.

विधिमंडळ अधिवेशनाचा कालचा दिवस सीमावाद प्रश्न, भूखंड घोटाळा आणि सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीवरून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये तू तू – मैं मैं ने गाजला. तर आज सकाळी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर अभंग गात आंदोलन केले. भूखंड घोटाळ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, संजय राठोड यांच्या नावाने शिमगा करीत त्यांचा निषेध केला. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळील काँग्रेस कार्यालयाजवळून फुगड्या घालत, रिंगण करीत व अभंग गात या निषेध मोर्चाला सुरुवात झाली. सर्व आमदारांनी डोक्यात पांढऱ्या टोप्या परिधान करून, गळ्यात टाळ लटकवून ते वाजवत विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ येऊन आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments