राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता मात्र जोरदार वाढली आहे. या चित्रपटाचा टीझर कृष्णधवल चित्रपटांच्या गोल्डन एरात घेऊन जाणारा आहे.
या टीझरमध्ये संपूर्ण साने कुटुंबीय एकत्र दिसत असून ते घराबाहेर उभं राहून फॅमिली फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा टीझर संपूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट आहे. हा व्हिडीओ सुरू असताना ‘भरजरी गं पितांबर’ हे गाणं ऐकू येत आहे. यातून चित्रपटातील कलाकारांचे लूक्स, सेट, संवाद ते अगदी संगीत अशा साऱ्या गोष्टींना गोल्डन टच दिलेला जाणवतो. या टीझरमधून हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याचीही घोषणा करण्यात आली. त्यानुसार दिवाळीच्या मुहूर्तावर १० नोव्हेंबर, २०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
https://www.instagram.com/reel/CyLMF-yJ8T0/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे. तर या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्याबरोबरच गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे , गंधार जोशी, अनिकेत सागवेकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.