निगडी येथील प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य लोकसभा निवडणुकीसाठी स्वतः मतदान करणारच आहेत शिवाय ते मित्र मंडळी,नातेवाईक तसेच परिसरातील नागरिक यांनीही मतदान करावे यासाठी सामाजिक बांधिलकीतून स्वतः जनजागृती करून राष्ट्रीय कर्तव्य पार पडणार असल्याची माहिती या संघाच्या अध्यक्षा अर्चना वर्टीकर यांनी दिली.
प्राधिकरण निगडी येथील तारांगण हॉलमध्ये प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाचा ३३ वा वर्धापन दिन आज संपन्न झाला, यावेळी उपस्थित शेकडो सभासदांनी “लोकशाहीवर निष्ठा ठेवून, मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू” अशी शपथ घेऊन १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला,त्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षा अर्चना वर्टीकर या बोलत होत्या.
पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार तसेच ३३,मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव , तहसीलदार जयराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी मुकेश कोळप,प्रफुल्ल पुराणिक यांनी जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.
यावेळी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी आपापल्या परिसरात मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती करण्याची तयारी दर्शविली,या संघामध्ये १५०० सदस्य कार्यरत आहेत.