Thursday, February 6, 2025
Homeराजकारणजेजुरीच्या खंडोबा गडातील मुख्य मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले

जेजुरीच्या खंडोबा गडातील मुख्य मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले

संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडातील मुख्य मंदिर दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिन्यापासून बंद ठेवण्यात आले होते. मंदिर दुरुस्तीचे बहुतांशी काम पूर्ण झाल्याने शनिवारपासून (२१ ऑक्टोबर) मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल्याची माहिती श्री. मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी विश्वस्त अनिल सौंदाडे,मंगेश घोणे,अॅड विश्वास पानसे, ऍड पांडुरंग थोरवे, राजेंद्र खेडेकर,व्यवस्थापक राजेंद्र जगताप उपस्थित होते.

खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा बंद असल्याने जेजुरीत येणाऱ्या भाविकांची संख्या घटली होती. त्यामुळे जेजुरीच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. आता खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले झाल्याने दसऱ्यानंतर भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्यातर्फे खंडोबा गडावर मंदिर दुरुस्तीचे व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे मंदिर बंद ठेवावे लागले होते.

खंडोबा देवस्थानतर्फे दसरा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कडेपठारच्या डोंगरातील रमणा या ठिकाणी रस्त्याची स्वच्छता व सर्वत्र पथ दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रमणामध्ये मध्यरात्री कडेपठारची पालखी व खंडोबा गडातील पालखी यांच्या भेटीचा पारंपरिक सोहळा असतो. याला हजारो भाविकांची उपस्थिती असते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी खंडोबा गडामध्ये एक मण वजनाचा खंडा (तलवार) उचलणे आणि कसरतीचे कार्यक्रम असतात. यावेळी प्रत्येकी सात बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख,पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक आनंद भोईटे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विश्वस्त मंडळाने दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments