१४ जानेवारी २०२०, न्यूज १४ (अर्चना वारणकर),
सध्या आशयघन चित्रपटांची निर्मिती मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने येत आहेत. असाच वेगळा विषय म्हणून ‘चिवटी’ या सिनेमाबद्दल बोलता येईल. चिवटीमध्ये गोष्ट मिळणार नाही, पण दुर्लक्षित समाजाच्या जगण्याची सफर अनुभवता येईल. ऊस तोड मजूर, त्यांना येणारे चांगले-वाईट अनुभव, प्रतिष्ठीत समाजाकडून मिळणारी वागणूक, सोयीं अभावी करावे लागणारे काम हे सगळे यामध्ये दिसणार आहे. आजपर्यंत बातम्यांमधून दिसणारा हा समाज घटक कसा जगतो, हे सार्यांनीच समजून घेणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या मामी, पिफ चित्रपट महोत्सवात सार्यांनीच याचे कौतुक केले आहे, असे मत चिवटी सिनेमाचे लेखक दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांनी व्यक्त केले.
राजकुमार तांगडे हे नाट्यक्षेत्राशी निगडीत असून देऊळ,जाऊंद्याना बाळासाहेब, नागरिक, तुकाराम आदी सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. नंदू माधव यांनी दिग्दर्शित केलेले ‘शिवाजी अंडरग्राऊंड ईन भीम मोहल्ला’ या नाटकाचे लेखनही तांगडे यांनी केले आहे.
“चिवटी”या सिनेमाबाबत त्यांच्याशी बातचित करण्यात आली.सिनेमातील कलाकारांबद्दल बोलताना तांगडे म्हणाले की, नाट्यक्षेत्राशी संबंधित कलाकारांनी यामध्ये भूमिका केली आहे. मिलिंद शिंदे, दिलीप घाटे, संभाजी तांगडे आदी कलाकार यामध्ये आहेत. निर्माते कैलास सानप, आदीनाथ ढाकणे यांना ऊसतोड मजूर विषयावर सिनेमा तयार करायचा होता. त्याबाबत विचारणा केली असता, मी होकार दिला आणि चिवटी साकार झाला. शेतकरी असल्याने हा विषय तसा माझ्या जिव्हाळ्याचा होता. अनेक गोष्टी माहित असल्याने लेखन करणे अत्यंत सोपे गेले.साखर हा माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असला तरी ती साखर कशी बनते हे ही लोकांना माहित नसते. ही साखर गोड होण्यामागे खूप मोठी मेहनत असते. थंडीची पर्वा न करता, शेतात राहून ऊस तोडणी करीत असतात. आजारपणाचे दुःख नाही, की बाळंतपणाचे कौतुक. सारे ऊठून पहाटेपासून कामाला सुरूवात करतात. कोणत्याच सोयी-सुविधा नसताना राबत असतात, पण तरीही त्यांच्यात नकारात्मकता दिसत नाही, असेही तांगडे यांनी सांगितले.
सिनेमाबाबत बोलताना म्हणाले की,चिवटीमध्ये बोली भाषेचा चपखलपणे उपयोग केलेला आहे. पात्रे मराठवाड्यातील असल्याने त्यांची वेगळी भाषा, तर काम करण्यासाठी येतात ते कोल्हापूरात. त्यामुळे तिथलीही भाषा वापरली आहे.सिनेमाचे शुटिंग बीड, कोल्हापूर,औरंगाबादमध्ये झालेले आहे.
साधना मासिकाचे संपादक विनोद शिरसाट यांनी साधना दिवाळीअंकात यावर लेख लिहिला होता.त्यालाही वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.ग्रामीण विषयावर शहरी लोकांकडूनही कौतुक होत आहे.
लेखिका राजश्री गुप्ते म्हणाल्या की, बोली भाषेचा इतका छान वापर केलेला मी पहिल्यांदाच पहात आहे. मला सिनेमा खूप आवडला आहे.