काल अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, मी कामाचा माणूस आहे. त्यामुळे राज्यातील विविध प्रश्नासंदर्भात बैठका घेतो, कामाची माहिती घेतो, अडचणी जाणून घेतो, त्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करतो.
पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाच्या विषय दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. फक्त आता एका मंत्र्यांची सही बाकी आहे. मी दिल्लीला गेल्यानंतर संबंधितांना भेटून त्यांची सही घेणार आहे. त्यामुळे शहरवासीयांचे निगडी ते कात्रज मेट्रोचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पडणार आहे. स्वारगेटला मेट्रोसाठी भूमिगत काम करायचे आहे. त्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याशिवाय पर्याय नाही. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी कामाला लागलो आहे असे आजित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून इतर आरक्षणाला कोणताच धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू आहे. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण, ते उच्च न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. तो निर्णय उच्च न्यायालयात टिकला पण सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार घटनेच्या तरतुदीत टिकेल, असे आरक्षण देण्यास महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. मुस्लिम समाजालाही न्याय दिला पाहिजे. त्या उद्देशाने त्यांच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला. त्यांच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.