Monday, July 20, 2026
Homeताजी बातमीजगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज..

जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज..

महापालिकेकडून जय्यत तयारी; सोहळ्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध

आषाढीवारी निमित्त अवघे वातावरण भक्तीमय झाले असतानाच, वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड उद्योगनगरी पूर्णपणे सज्ज झाली असून महापालिकेने सर्व तयारी पूर्ण केली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शहरात अत्यंत उत्साहात स्वागत केले जाणार आहे. महापालिकेकडून वारकऱ्यांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यंदा बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शहरात आगमन होणार असून या पालखीचा शहरात मुक्काम देखील होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी, गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजता आळंदी-दिघी रोडवरील मॅगेझीन चौक, भोसरी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन होईल. या दोन्ही ऐतिहासिक सोहळ्यांच्या स्वागतासाठी महापालिकेने मुख्य प्रवेशद्वारांवर सुसज्ज व आकर्षक स्वागत मंडप उभारले असून मुक्कामाच्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तयारीचा आढावा घेतला. आकुर्डी येथे मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू विद्यालय आणि वसंतदादा पाटील विद्यालय या शाळांमध्ये दिंड्यांचा मुक्काम असतो. या ठिकाणी महापौर आणि आयुक्तांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, स्नानगृहे आणि परिसरातील स्वच्छता या बाबींसह वीज पुरवठा आणि आवश्यक सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.  पालखी सोहळ्यामध्ये पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. 

महापालिकेकडून आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी,अखंडित पाणीपुरवठा आणि आवश्यक फिरती शौचालये, वैद्यकीय सुविधा, स्नानगृहे यांसारख्या मूलभूत सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध राहतील याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

सध्या शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने प्रशासनाने नागरिकांना आणि भाविकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, तसेच गर्दी आणि पावसाचे वातावरण पाहता, पालखी दर्शनासाठी येणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत बोलताना महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, पालखी सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी महापालिकेने प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती केली असून पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्था चोख ठेवत संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. शिवाय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी इंसिडंट कमांडर देखील नेमण्यात आले आहेत.

पालखी सोहळा म्हणजे विश्वबंधुता आणि मानवी कल्याणाची बीजे रोवणाऱ्या संतांच्या विचारांचा जागर

महापौर रवी लांडगे यांनी स्वागतपर भावना व्यक्त करताना सांगितले की, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे शहरात आगमन होत आहे, हा आपल्या उद्योगनगरीसाठी अत्यंत आनंदाचा क्षण असून महापालिकेकडून आणि पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने सर्व वारकरी भाविकांचे भावपूर्ण स्वागतासाठी शहर आतुर आहे. या सोहळ्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कोणतीही कमतरता राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. पालखी मार्ग आणि पालखी मुक्कामाच्या ठिकाणी महापालिका यंत्रणा कार्यरत राहणार आहे. पावसाच्या दृष्टीने नागरिकांनी देखील आवश्यक काळजी घेऊन या सोहळ्यात सहभागी व्हावे. संतांनी विश्वबंधुता आणि मानवी कल्याणाचा विचार जगाला दिला आहे. संतांच्या विचारांचा जागर पालखी सोहळ्यानिमित होत असतो. आपण देखील संत विचार जोपासण्यासाठी कटिबद्ध होऊया, अशा भावना महापौरांनी व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments