परप्रांतीय कामगारावर काल मध्यरात्री पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तरुणाला प्राण गमवावे लागले. हल्लेखोर पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. मात्र हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं आहे.
घोरपडे पेठेतील एका सदनिकेत शिरून परप्रांतीय कामगारावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला. पसार झालेल्या हल्लेखाेराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. खुनामागचे कारण समजू शकलेले नाही.
अनिल साहू (वय ३५ वर्ष, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे आहे. साहू मूळचा बिहारमधील आहे. तो पत्नी आणि कामगारांसोबत खडकमाळ आळीत सिंहगड गॅरेज चौक परिसरात एका सोसायटीत भाडेतत्वावर सदनिका घेऊन राहत होता.
रविवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हल्लेखोराने सदनिकेत शिरून साहूवर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या साहूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने आणि पथकाने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला.