पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी आणि आकुर्डी परिसरतील तब्बल ६० हजार ग्राहकांची वीज गेली होती. यामागचं कारण समोर आलंय. भोसरी MIDC येथील सब स्टेशनच्या ट्रान्सफार्मरवर मांजर चढले होते, तेव्हा शॉर्ट सर्किट होऊन ६० हजार ग्राहकांची वीज गेली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या अजब घटनेमुळे शहरातील आकुर्डी आणि भोसरी येथील नागरिकांना उकड्यामुळे घामाघूम व्हावं लागलं आहे तर भोसरी येथील औद्योगिक क्षेत्राला याचा फटका बसला आहे.
त्याचं झालं असं की, पिंपरी चिंचवडमधील महापारेषणच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये सकाळी मांजर घुसलं. त्यामुळे शहरातील बत्ती गुल झाली. विजेच्या जोरदार धक्क्याने मांजरीच्या जागीच मृत्यू झाला. पण आकुर्डी, भोसरी शहर, भोसरी एमआयडीसी भागातील तब्बल 60 हजार ग्राहकांना याचा मोठा फटका बसल्याची माहिती माहापारेषणच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. दरम्यान, औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठा 12 – 12 तास शेड्यूल करण्यात आलाय. तर रहिवासी भागातील काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरु झाला असून काही भागातील वीज सुरळीत होण्यास अजून काही कालावधी लागणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, महापारेषणकडून बिघाड झालेल्या १०० एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची सध्या तपासणी सुरु आहे. त्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यास आल्यास तो बदलण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापारेषणच्या २२० केव्ही उपकेंद्रात सध्या सुरु असेलल्या एकमेव ७५ एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून त्यावरील १६ वीजवाहिन्यांसह सध्या बंद असलेल्या १० वीजवाहिन्यांना देखील पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा द्यावा लागणार आहे. या कालावधीत भोसरी विभागातील वीजपुरवठ्याची स्थिती अधिकच विस्कळीत होण्याची शक्यता आहे. एकाच पॉवर ट्रान्सफॉर्मरवरून विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने भोसरी विभागात चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करून सर्व ग्राहकांना वीजपुरवठा करावा लागणार आहे. मात्र अशी स्थिती १०० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यासच उद्भवू शकते अशी माहिती महापारेषणकडूनन देण्यात आली.
या भागातील बत्ती गुल?
पिंपरीतील प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील 4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. महावितरणकडून याबाबत संबंधित सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली होती.