७ एप्रिल २०२१,
राज्यभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. रोजचे रुग्णवाढीचे आकडे 50 हजाराच्या घरात पोहोचत आहेत. बीड जिल्ह्यात तर कोरोनाचा वाढता समूहसंसर्ग उच्छाद मांडत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असले, तरी परिस्थिती अद्याप आटोक्यात येत नाही. अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगर पालिकेवर आली.
अंबाजोगाई नगर पालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर या 8 जणांना अग्निडाग दिला. यामध्ये 1 महिला असून सर्व मयत रुग्ण 60 वर्षापुढील आहेत.दरम्यान अंबाजोगाई तालुक्यात 4 दिवसात 500 च्या आसपास रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, काही नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत, मृतांचे प्रमाण कमी असले तरी अंबाजोगाई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णाच्या वाढत्या आकडेवारीला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाकडून दहा दिवसाचा लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. लॉकडाऊन काळात एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
औरंगाबादमध्ये अंत्यसंस्काराला जागा मिळेना…
अंत्यसंकरसाठी औरंगाबादच्या स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत मृतदेहांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे. जागा मिळेल तिथे नातेवाईक दाहसंस्कार करत आहेत. स्मशानभूमी अपुरी पडत असल्यामुळे जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार सुरू असल्याचं चित्र औरंगाबादेत आहे. टीव्ही सेंटर स्मशानभूमीत सर्वत्र पेटलेल्या चिंताचे चित्र आहे. एक चिता विझण्याआधीच दुसरी चिता पेटत आहे. कोरोना मृतांचा आकडा वाढल्यामुळे स्मशानभूमीतही मरणासन्न स्थिती आहे.