मुंबईमध्ये आज पार पडत असलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी मैदानातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्यांसाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्याप्रमाणात या मेळाव्यांसाठी कार्यकर्ते हजर आहेत. दोन्ही बाजूकडील आमदार आणि नेत्यांनी संपूर्ण ताकद लावून मैदान भरण्यासाठी आणि आपल्या गटाची ताकद लावण्यासाठी गर्दी गोळा करण्याच्या उद्देशाने मागील काही दिवसांपासून तयारी सुरु केली होती. मात्र यापैकी बीकेसीमधील मेळाव्याला परराज्यामधून येऊन पुण्यात काम करणाऱ्या कामगारांना घेऊन आल्याचं ‘टीव्ही ९ मराठी’ने उघड केलं आहे. बालेवाडी येथून शिंदेंच्या मेळाव्यासाठी आलेल्या ट्रॅव्हल बसेसमधून पुण्यातील मराठी न समजणाऱ्या कामगारांनाही फिरायला जायचं आहे असं सांगून या मेळाव्यासाठी आणण्यात आलं आहे.
बालेवाडी स्टेडीयममधून दुपारच्या सुमारास काही शिंदे समर्थक कार्यकर्त्यांच्या ट्रॅव्हल बसेस बीकेसी मैदानाकडे रवाना झाल्या. या बस रवाना होण्याआधी बसमधील काही व्यक्तींशी वृत्तवाहीनीच्या पत्रकाराने चर्चा केली असता केवळ प्रवास मोफत असल्याने या मेळाव्याला मराठी न समजणाऱ्या लोकांनाही घेऊन जाण्यात येत असल्याचं उघड झालं. यापैकी कुणाला मुंबईमध्ये यात्रा आहे असं सांगण्यात आलं तर कुणाला फिरायला चला असं सांगून बीकेसीच्या मेळाव्याला आणण्यात आलं आहे. हे सर्व कामगार आपण पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारचे असल्याचं सांगतात. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जाणाऱ्या बसेसने ते मुंबईला रवाना झाले.
बसमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकाराने पहिल्याच आसनावर बसलेल्या व्यक्तीला, काय सांगाल कुठून आला आहात आणि कुठे जाणार आहात? असा प्रश्न विचारला. त्यावर या व्यक्तीने, “हम को नही आता, इनको आता है” असं म्हणत मराठी भाषा समजत नसल्याचं पत्रकाराला सांगितलं. यावर हिंदीमध्येच पत्रकाराने ‘तुम्ही कुठे चालला आहात?’ असं विचारलं. त्यावर ‘मुंबई; असं उत्तर त्या व्यक्तीने दिलं. तसेच ‘पुढचे प्रश्न बाजूच्या व्यक्तीला विचारा मला ठाऊक नाही’ असंही या व्यक्तीने सांगितलं. या व्यक्तीच्या मागील आसनावर बसलेल्या व्यक्तीने, “आम्हाला सांगितलं की तिकडे जत्रा (मेळावा) आहे. तुम्हाला फिरायला घेऊन जात आहोत,” असं म्हटलं.
पत्रकाराने या परराज्यातील व्यक्तीला ‘मुंबईत कोणाचा कार्यक्रम आहे असं तुम्हाला सांगण्यात आलं होतं?’ असा प्रश्न विचारला. त्यावर, “ते नाही सांगितलं आम्हाला. आम्हाला कोण घेऊन जात आहे हे सुद्धा ठाऊक नाही,” असं उत्तर या व्यक्तीने दिलं. “आम्हाला काहीच सांगण्यात आलं नव्हतं. केवळ तिकडे जत्रा आहे आणि तुम्हाला फिरायला घेऊन जात आहोत, असं कळवण्यात आलं,” असा दावा या कामगारांनी केला आहे.
‘तुम्ही कुठून आहात?’ असा प्रश्न विचारला असता या कामगाराने, “मी बिहारचा आहे. मी पुण्यात उंद्रीमध्ये राहतो,” असं सांगितलं. अन्य एका कामगाराने, “आपण पश्चिम बंगालचे असून मुंबईला जात आहोत,” अशी माहिती दिली. अचानक मुंबईला जाण्याचं कारण विचारलं असता, “गाडी फ्री आहे तर जायचं आहे,” असं सांगण्यात आल्याची माहिती या कामगाराने दिली.