Wednesday, June 18, 2025
Homeउद्योगजगतरेल्वेच्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेजलाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण..

रेल्वेच्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेजलाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण..

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते खातेदारांचा सत्कार

रेल्वेच्या पुणे- नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमीनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून याअंतर्गत संपूर्ण प्रकल्पातील पहिले खरेदीखत आज पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी खरेदीने जमीन दिलेल्या चंद्रकांत गंगाराम कोलते आणि स्मिता चंद्रकांत कोलते यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी या खरेदीखतासाठी पुढाकार घेतलेल्या भूसंपादन क्र. 4 च्या उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे- फडतरे, रेल्वेचे सहमहाव्यवस्थापक (प्रकल्प) सागर अग्रवाल, सहमहाव्यवस्थापक (नियोजन) व्ही. के. गोपाल उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी कोलते दांपत्याचे अभिनंदन केले. ते म्हणाले, पुणे व नाशिक जिल्ह्यातील कृषीमाल वाहतूक, मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूकीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून प्रकल्प गतीने मार्गी लावण्यासाठी अशाच प्रकारे शेतकऱ्यांचा पुढाकार आवश्यक आहे. शेतकऱ्यांना जमिनीसाठी योग्य मोबदला मिळत आहे असा संदेश आजच्या खरेदीखतातून जाणार आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

हवेली तालुक्यातील 12 गावांचे भूसंपादनाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यातील 8 गावांची पूर्ण तर 2 गावांची अंशत: संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. आज झालेले खरेदीखत हे हवेली तालुक्यातील पेरणे गावातील असून प्रकल्पात समावेश असलेल्या तीनही जिल्ह्यातील हे पहिले खरेदीखत आहे, अशी माहिती यावेळी श्रीमती आखाडे- फडतरे यांनी दिली.

सेमी हायस्पीड प्रकल्पाची वैशिष्टये

महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.मार्फत या रेल्वे मार्गाचे बांधकाम होणार आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर अशा चार तालुक्यात मिळून एकूण 54 गावांचा यात समावेश आहे. पुणे जिल्ह्यात पुणे या पहिल्या स्थानकासह हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या स्थानकांचा समावेश आहे. प्रमुख स्थानकांपैकी चाकण, मंचर तसेच नारायणगाव ही स्थानके कृषी उत्पादन व खासगी मालवाहतूक टर्मिनल असणार असून राजगुरूनगर स्थानक हे फक्त प्रवासी रहदारीसाठी असणार आहे.

भूसंपादन प्रक्रियेला गती

जिल्ह्यात प्रकल्पासाठी भूसंपादन करावयाच्या गावांपैकी 37 गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. तसेच उर्वरित प्रकरणात मोजणी प्रक्रिया, मूल्यांकन टिपणी सहाय्यक नगररचना कार्यालयाकडे पाठवणे आदी प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पासाठी खासगी वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येत आहे. जमिनीसाठी रेडी रेकनरच्या 5 पट दर देण्यात येत असून इमारत तसेच इतर बांधकामे, झाडे आदींसाठी मूल्यांकनाच्या अडीच पट रक्कम दिली जाणार आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments