आष्टी – अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर आपले सरकार भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या २६१ कि.मी. रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या नवीन आष्टी – अहमदनगर ६६ कि.मी. मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ अशा दुहेरी कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे बोलत होते.
प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होते. माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सर्वश्री बाळासाहेब आजबे, लक्ष्मण पवार, सुरेश धस, आष्टीच्या नगराध्यक्षा श्रीमती पल्लवी धोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्यासह रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
दिवंगत गोपिनाथरावांनी पाहिलेले रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न आज सत्यात आले आहे, याचे आपणास विशेष समाधान असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आज गोपिनाथराव हयात असते तर त्यांनी हा मार्ग बीड-नगरवासियांना अर्पण केला असता. राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांबाबत त्यांनी दूरदृष्टी दाखवली होती. त्यात या रेल्वे प्रकल्पाचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रगती योजनेत अहमदनगर – बीड – परळी या २६१ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गाचा समावेश आहे. त्यासाठीच्या ५० टक्के खर्चाच्या तरतुदीची जबाबदारी शासनाने उचलली आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, हा रेल्वे प्रकल्प केवळ दोन भूभाग आणि स्थानकांना जोडणारा नाही, तर माणसे, नातीगोती आणि हृदयांना जोडणारा आहे. या रेल्वेमुळे आता अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांना रोजच विकासाची धडधड जाणवणार आहे. विद्यमान शासनाच्या विकासाचा मार्ग वेगाचा राहणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील हा बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकल्याबद्दल मध्य रेल्वेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
दीर्घ संघर्षानंतर अहमदनगर-आष्टी रेल्वे धावत असल्याचा आपणास आनंद असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिवंगत गोपिनाथराव मुंडे यांनी बीड येथे रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. आज पहिल्या टप्प्यात न्यू आष्टी – अहमदनगर डेमू आणि रेल्वे मार्गाचे उद्घाटन झाले. हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.