Tuesday, March 18, 2025
Homeअर्थविश्वकिरण गोसावी विरुद्ध फसवणुकीचा पहिला गुन्हा पिंपरी-चिंचवड मधील भोसरी पोलीस स्थानकात दाखल

किरण गोसावी विरुद्ध फसवणुकीचा पहिला गुन्हा पिंपरी-चिंचवड मधील भोसरी पोलीस स्थानकात दाखल

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमधून आर्यन खान क्रुझ ड्रग्ज पार्टीत प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सद्यस्थितीला पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या किरण गोसावीने 2015 मध्ये परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैसे घेतल्याची तक्रार दाखल झाली आहे. विजयकुमार सिद्धलिंग कानडे (33)वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली आहे. गोसावीने ब्रुनेई इथं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरी लावण्याचे आमिष पीडित व्यक्तीला दिले होते. त्यासाठी विजयकुमार कानडे यांच्याकडून 2 लाख 25 हजार इतकी रक्कम घेतल्याची माहिती त्यांनी तक्रारीत दिली आहे. ज्या- ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे, त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन भोसरीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी केले आहे.

यापूर्वीही गोसावीच्या विरोधात पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. 2018 मध्ये मलेशियात नोकरी लावण्याच्या बहाण्याने तब्बल तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांकडून परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने दीड लाख रुपये घेतले होते. या फसवणूक प्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण गोसावीने मलेशिया, सिंगापूर यासारख्या ठिकाणी नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणाची फसवणूक केली आहे. यासाठी त्याने तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.

वादग्रस्त व बनावट पंच असलेला किरण गोसावी हे देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments