चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. येत्या २६ फेब्रुवारीला या दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून दोन मार्चला निवडणूक निकाल लागणार आहे. चिंचवडमध्ये शिवसेना-ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आणि राहुल कलाटे अशी तिरंगी लढत बघायला मिळत आहे. त्यामुळे अटीतटीच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागल आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडमधून निवडणूक लढवली होती. तर, त्यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांनी निवडणूक लढवली होती. कलाटे यांनी लढवलेली ही निवडणूक महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग म्हणून ओळखली गेली. आणि त्यानंतर महाविकास आघाडी होऊन राज्यात सत्ता स्थापन केली होती. आता मात्र महाविकास आघाडी अस्तित्वात असताना वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीची गोची केली आहे.
एकीकडे शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने कलाटे यांना थेट पाठिंबा देऊ शकत नाही. मात्र दुसरीकडे शिवसेनेची वंचित सोबत युती आहे. वंचितची महाविकास आघाडी सोबत युती नाही. त्यामुळे वंचितने मोठी खेळी करत कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. भाजपला रोखण्याचे काम कलाटे करू शकतात असं म्हणत वंचितने अपक्ष असणाऱ्या कलाटेंना पाठिंबा दिला आहे. मात्र वंचितच्या या खेळीने भाजपचाच फायदा होत अश्विनी जगताप यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
राहुल कलाटे यांनी वंचितकडे पाठिंब्याची मागणी केली होती. त्यांच्या या आवाहनाला वंचितने सकारात्मक प्रतिसाद देत कलाटेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी टेन्शन वाढल आहे. अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यामध्ये जोरदार टक्कर होईल, असं बोललं जात आहे. मात्र, या दोघांमध्ये वंचितच्या पाठिंब्याने वजन वाढलेले कलाटे यांच्या मताधिक्यात वाढ होऊ शकते. चिंचवड विधानसभा मतदार संघात वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. एखाद्या उमेदवाराचा विजय आणि पराजय ठरेल इतका प्रभाव वंचितचा या मतदारसंघात आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या मागे असणारा मतदार हा वंचितचा उमेदवार नसेल तर आपसूक काँग्रेस वा राष्ट्रवादीकडे वळला जातो. त्यामुळे चिंचवडमध्ये हा मतदार वंचितचा उमेदवार नसल्याने माविआचे उमेदवार नाना काटे यांच्या मागे उभा राहिला असता. मात्र, ऐनवेळेस प्रकाश आंबेडकर यांनी मोठी खेळी करत कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे नाना काटे यांचे सगळी गणितं बदलली आहेत. वंचितचा मतदार जर कलाटे यांच्या मागे गेला तर नाना काटे यांच्या अडचणीत वाढ होऊन भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो.