२९ जानेवारी २०२१,
कोरोना संकटाने व्यापलेल्या २०२०-२१ या वर्षात सरकारने आर्थिक आघाडीवर कशी कामगिरी केली याचे प्रगती पुस्तक अर्थात आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल आज संसदेत मांडला जाणार आहे. आजपासून दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला औपचारिक सुरुवात होईल.
करोना विषाणूने देशात शिरकाव केल्यानंतर मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय टाळेबंदी घोषित केली होती. जवळपास अडीच महिन्यांहून अधिक काळात कठोर टाळेबंदीची अमलबजावणी झाली. यामुळे आर्थिक घडामोडी पूर्ण ठप्प झाल्या. लाखो कोटींचा व्यवसाय बुडाला. कोट्यवधी बेरोजगार झाले होते. विकासदराने उणे २३ टक्क्यांची ऐतिहासिक नीचांक गाठला होता.
आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. यंदा आर्थिक पाहणी अहवालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. चालू वर्षात करोनाने अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे आर्थिक पाहणीमध्ये विकासदराचा काय अंदाज लावला जातो याची गुंतवणूकदारांना उत्सुकता आहे.
आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल
आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल २०२०-२१ शुक्रवारी २९ जानेवारी रोजी संसदेत सादर केला जाईल. निर्मला सीतारामन हा अहवाल संसदेपुढे मांडतील. आर्थिक सर्वेक्षण पाहणी हा अर्थ खात्याचा महत्वाचा दस्तावेज आहे. सरत्या आर्थिक वर्षात सरकारने कोणती विकास कामे केली, किती खर्च केला, सरकारने निधी कसा जमवला याचा लेखाजोखा मांडला जातो.