पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज ते रूबी हॉल या दोन योजनांचे लोकार्पण मंगळवारी झाले. यानंतर पुणे मेट्रो सर्वसामान्य पुणेकरांसाठी सुरु झाली. मेट्रोमुळे पुणेकरांचा तासाचा प्रवास काही मिनिटांवर आला आहे. दरम्यान यामुळे सातारकऱ्यांच्याही शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. याचं कारण असं की या सेवेदरम्यान आपल्यातील कौशल्याची चुणूक दाखविण्याची संधी साताऱ्याची कन्या असणाऱ्या अपूर्वा प्रमोद अलाटकर हिला मिळाली.
मेट्रोची ‘मास्क ऑन की’च्या साथीने लोकोपायलट अपूर्वाने सर्व तांत्रिक बाबींच्या मदतीने वनाझ येथून उद्घाटनाची फेरी पूर्ण केली. नियोजनानुसार अपूर्वा वनाझ येथील मेट्रोत ‘मास्क ऑन की’सह सज्ज होती. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने ‘मास्क ऑन की’चा वापर करत मेट्रो रूबी क्लिनिककडे मार्गस्थ केली.
साताऱ्यातील सुरेखा यादव या वंदे भारत ट्रेन चालवणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोपायट ठरल्या होत्या. त्यांच्यानंतर आता साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली आहे. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनीही अपूर्वांचे ट्विट करत कौतुक केले आहे.
शाहूपुरीतील रांगोळे कॉलनीत अपूर्वा अलाटकर राहते. प्रमोद आणि उज्वला यांची ती कन्या. अपूर्वाचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण बापूसाहेब चिपळूणकर शाळेत झाले. यानंतर तिने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण अनंत इंग्लिश स्कूलमध्ये पूर केले. दहावीनंतर तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण सोलापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केले. येथील शिक्षण संपवून साताऱ्यात परत आल्यानंतर तिने सज्जनगड येथील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये त्याच शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
फेब्रुवारी २०२३ मध्ये अपूर्वाने मेट्रोतील सेवेत आपले स्थान पक्के केले. निवडीनंतर तिच्याकडे वनाझ स्थानकाच्या स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी सोपविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे ठरल्यानंतर चारही मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो चालविण्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण सुरू केले. या प्रशिक्षणार्थीमध्ये अपूर्वाचा देखील समावेश होता. हे ४५ दिवसांचे खडतर तांत्रिक प्रशिक्षण तिने पूर्ण केले. त्यानंतर तिला ही संधी मिळाली.