Sunday, February 15, 2026
Homeताजी बातमी‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाने उजळणार पिंपरी चिंचवडची सांस्कृतिक पहाट — ग. दि. माडगूळकर...

‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाने उजळणार पिंपरी चिंचवडची सांस्कृतिक पहाट — ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात १८ ऑक्टोबरला भव्य आयोजन

भारतीय संस्कृतीतील प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा उत्सव असलेल्या दिवाळीचे स्वागत यंदा पिंपरी चिंचवड महापालिका विशेष पद्धतीने करणार आहे. महापालिकेच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. १८ ऑक्टोबर) पहाटे सहा वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. संगीत, नृत्य आणि कलांचा संगम असणारा हा कार्यक्रम शहरातील नागरिकांसाठी एक अनोखा सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.

तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, महेश लांडगे, शंकर जगताप, तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, विविध विभाग प्रमुख आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे “दिपगंध सुरांचा… सुरांच्या सुवासात उजळलेली दिवाळी पहाट” हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात कोमल कृष्णा, राजेश्वरी, विनय देशमुख आणि गणेश मोरे हे गायक कलाकार सादरीकरण करणार असून, नितीन खंडागळे, सुबोध जैन, दीपक काळे, शाम चंदनशिवे आणि सागर घोडके वादन कलाकार म्हणून साथ देणार आहेत, अशी माहिती क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांनी दिली.

या निमित्ताने शास्त्रीय, सुगम, भक्तिगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताचे सूर पहाटेच्या प्रसन्न वातावरणात दुमदुमतील. पारंपरिक पोशाख, दीपप्रज्वलन आणि दिव्यांच्या सजावटीने कार्यक्रमाला मंगल वातावरण लाभणार आहे. सर्वांसाठी मोफत असणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या संगीतसफरीचा आनंद घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले:

“महापालिका प्रशासन विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. ‘दिवाळी पहाट’ सारखे उपक्रम संस्कृतीचे जतन, कलावंतांना प्रोत्साहन आणि नागरिकांमध्ये सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी महत्त्वाचे आहेत.”

उप आयुक्त पंकज पाटील म्हणाले:

“धनत्रयोदशीच्या दिवशी स्वर, ताल आणि भावनांचा सुरेल मेळ साधणारा हा कार्यक्रम नागरिकांना दिवाळीच्या उत्सवात अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव देईल. शहरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments