शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर केवळ महाविकासआघाडी सरकार कोसळलं नाही, तर शिवसेना कुणाची हाच प्रश्न निर्माण झालाय. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर केला असला, तरी राजकीय आखाड्यातही पक्षावरील मालकी सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटा आमनेसामने आले आहेत. याचाच भाग म्हणून दोन्ही गटांनी बाळासाहेब ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेवर दावा केलाय. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला. आता ठाकरे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा ट्रेलर लाँच केलाय. याची सध्या जोरदार चर्चा आहे.
शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे टीझर ट्वीट करण्यात आलं आहे. हे ट्वीट करताना म्हटलं आहे, “शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!” हा दसरा मेळावा ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे.
उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील टीझरचं ट्वीट रिट्वीट केलं आणि शिवसैनिकांना “वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या,” असं आवाहन केलं.