१० जून २०२१,
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरुच आहे. ही लाट ओसरत असतानाच आता पुन्हा चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत झालेल्या मृत्यूंची संख्या ही एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे. देशातल्या दैनंदिन बाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे ६,१४८ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा तीन लाख ५९ हजार ६७६ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या मृत्यूंची संख्या तीन हजारांच्या खाली आली होती. मात्र, आता झालेली वाढ चिंताजनक आहे. देशातला मृत्यूदर आता १.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
देशातल्या दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. काल दिवसभरात देशात ९४ हजार ५२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे सध्या उपचाराधीन असलेल्या करोना रुग्णांचा आकडा आता ११ लाख ६७ हजार ९५२ वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात देशातले एक लाख ५१ हजार ३६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
देशात काल दिवसभरात ३३ लाख ७९ हजार २६१ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी ३० लाख ६५ हजार ९५१ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, तीन लाख १३ हजार ३१० नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २४ कोटी २७ लाख २६ हजार ६९३ वर पोहोचली आहे.