Saturday, March 22, 2025
Homeअर्थविश्वचांदणी चौक पूल बांधण्याचा खर्च २५ लाख.. पाडण्याचा खर्च दीड कोटी… !

चांदणी चौक पूल बांधण्याचा खर्च २५ लाख.. पाडण्याचा खर्च दीड कोटी… !

बहुचर्चित चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी तीन दशकांपूर्वी २५ लाख रुपये खर्च आला होता. मात्र, हा पूल पाडण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च आला. हा पूल उभारणाऱ्या बार्ली कंपनीचे सतीश मराठे यांनी या माहितीवर प्रकाश टाकला आहे. चांदणी चौकातील पूल पाडण्याची घटना केवळ पुण्यातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरली. सहाशे किलोंची स्फोटके वापरूनही पूल पूर्णपणे पडला नाही,तो खिळखिळा झाला, काही गर्डर आणि स्टीलचे अवशेष शिल्लक राहिले आणि त्यानंतर इतका मजबूत पूल कोणी बांधला, याची उत्सुकता ताणली गेली. १९९२ मध्ये हा पूल सतीश मराठे आणि अनंत लिमये यांच्या बार्ली इंजिनिअर्स कंपनीने उभारला असल्याची माहिती मिळाली.

या पुलाच्या बांधकामासाठी त्या वेळचे नवीन तंत्रज्ञान वापरले होते. स्टीलचा वापरही आवश्यक तेवढाच केला होता. एखादे काम सचोटीने केले तर ते चांगलेच होते. हा पूल पाडल्यानंतर वाईट वाटले, परंतु सध्या हा पूल वाहतूक कोंडीला जबाबदार ठरत असेल तर तो पाडण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता. विकासाच्या दृष्टीने ते आवश्यकच असते, अशी भावना मराठे यांनी बोलून दाखवली. मराठे म्हणाले,की हा पूल बांधण्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च आला होता. तो पाडण्यासाठी दीड कोटींचा खर्च आला. हा पूल बांधण्यासाठी दोन स्टीलचे बार जोडताना त्या वेळी नवीन असलेले ‘कपलर’ तंत्रज्ञान वापरण्यात आले होते.

पुणे-मुंबई हा रहदारीचा मार्ग असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आम्हाला कमी वेळेत पूल उभारण्याचे आव्हान होते. ते पाच महिन्यांत पूर्ण केले होते. चांदणी चौकातील पूल आम्ही बांधला, परंतु या पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आम्हाला बोलावण्यात आले नव्हते.
गेल्या ५३ वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या मराठे यांनी (प्रभात रस्ता) सतीश मराठे कन्सल्टिंग इंजिनीअर्स या नावाने नवीन फर्म सुरू केली आहे. सध्या ते इमारतीच्या संरचना आणि बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. वयाच्या ७६ व्या वर्षी ते तितक्याच उत्साहात कार्यरत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments