२९ डिसेंबर २०२०,
सीरमतर्फे तयार करण्यात आलेल्या न्यूमोकॉकल लशीचे औपचारिक उद्घाटन सोमवारी करण्यात आले. त्यानंतर पूनावाला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या सद्य:स्थितीबाबत माहिती दिली. अॅस्ट्राझेनेका कंपनीबरोबरच्या सहकार्यातून सीरमने ‘कोव्हिशिल्ड’ या करोना प्रतिबंधक लशीचे उत्पादन केले आहे. त्याच्या दोन टप्प्यांतील चाचण्या पूर्ण झाल्या असून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. चाचण्यांतील निष्कर्षांबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय औषध महानियंत्रकांक डे (डीसीजीआय) सादर करण्यात आली असून, तातडीच्या परवानगीसाठी (इमर्जन्सी लायसन्स) अर्जही करण्यात आला आहे. सीरम इन्स्टिटय़ूटने उत्पादित के लेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लशीला जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात परवानगी मिळेल, असा आशावाद सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सोमवारी व्यक्त केला
अदर पूनावाला म्हणाले, ‘‘कोव्हिशिल्ड लशीच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. त्यामुळेच भारतासह इंग्लंडमधील चाचण्यांचे निष्कर्ष आम्ही केंद्रीय औषध महानियंत्रकांना सादर केले आहेत. सीरम आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीची ही ‘कोव्हिशिल्ड’ लस विकसित करताना त्याबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही. लशीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.’’
डिसेंबरअखेरीस किंवा जानेवारी महिन्यात इंग्लंडमध्ये लशीला परवानगी मिळेल, त्यापाठोपाठ भारतात परवानगी मिळण्याची शक्यता पूनावाला यांनी वर्तवली आहे. दरमहा सहा ते सात कोटी डोसचे उत्पादन करण्यात येत असून, लस बाजारात आल्यास एकूण उत्पादनाच्या ५० टक्के डोस प्राधान्याने भारतालाच देणार आहोत. उर्वरित ५० टक्के डोस इतर देशांना दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
हर्षवर्धन यांच्याकडून अभिनंदन
करोना विषाणू संसर्गाची टांगती तलवार देशावर असताना पूनावाला आणि सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या निर्मिती आणि चाचण्यांसाठी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पूनावाला आणि त्यांच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
बालकांच्या न्यूमोनियावर सीरमची लस
पुणे : सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या बालकांवरील न्यूमोनियाच्या ‘न्यूमोसिल’ या लशीचे औपचारिक उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी केले. जागतिक स्तरावर पाच वर्षांखालील सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचे कारण न्यूमोनिया हे आहे. त्यांपैकी २० टक्के बालके भारतीय आहेत. आतापर्यंत लस आयात करत असल्यामुळे ती देशातील सर्व बालकांसाठी देणे शक्य नव्हते. आता सीरमने तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारतासह जगातील बालमृत्यू रोखण्यास उपयुक्त ठरेल, असे मत डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले.