Friday, June 13, 2025
Homeअर्थविश्वपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेचा समारोप

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेचा समारोप

शहरातील आणि शहराबाहेरील बालगोपाळांसह युवक युवती, महिला आणि ज्येष्ठांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने फुललेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या पाच दिवसीय पवनाथडी जत्रेचा काल समारोप झाला. महिला बचत गटांच्या कौशल्य आणि कलागुणांना वाव देणारी ही जत्रा विविध वस्तूंच्या विक्री आणि प्रदर्शने तसेच याठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक उलाढालीसह महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या परंपरांचा वारसा सर्वार्थाने समृद्ध करणारी ठरली.

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा आणि शहराच्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने दि.१६ डिसेंबर ते दि. २० डिसेंबर २०२२ या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर पवनाथडी जत्रा भरवण्यात आली होती. आज या पवनाथडी जत्रेचा समारोप झाला. पवनाथडी जत्रेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसेवक शंकर जगताप, राजेंद्र राजापुरे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, सागर आंगोळकर, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिका कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना महापालिकेच्या वतीने बाजारपेठ उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आली. या मध्ये राज्यातील विविध विभागातून आलेल्या महिला बचत गटांनी आपल्या खाद्यसंस्कृतींचा थाट मांडला होता. यामध्ये मासे, मटन, चिकन, विविध प्रकारच्या बिर्याणी अशा विविध मांसाहारी पदार्थांचा समावेश होता. पुरणपोळी, पुरण मांडा तसेच सुका मेव्यापासून बनवलेली विविध प्रकारची चिक्की, उकडीचे व विविध प्रकारचे मोदक, छोले मटार करंजी, खोबर करंजी, छोले भटुरे, दिल्ली चाट, गुजराती ढोकळा, फाफडा, दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ, महाराष्ट्रीयन झुणका भाकरी, थालीपीठ, मेथी धपाटे अशा शाकाहारी खवय्यांना आवडेल अशा रुचकर भोजनाचा समावेश होता. या जत्रेत खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स देखील उभारण्यात आले होते.

या पवनाथडी जत्रेमध्ये सहभागी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ तसेच झालेल्या वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स ठेवलेल्या महिला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे आमच्या कलागुणांना वाव मिळाला असून महिलांना उत्तम व्यासपीठ तसेच आम्ही उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध झाली. हा उपक्रम अतिशय वेगळा असून या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. गेल्या ५ दिवसांपासून आम्ही याठिकाणी सुरु केलेल्या स्टॉलमधील वस्तू, पदार्थांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद देऊन आमच्या इच्छाशक्तींना बळ दिले. महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्याचा उत्तम मार्ग म्हणून या उपक्रमाचा महत्वपूर्ण वाटा आहे. आमचा विश्वास आता वाढला असून बाजारपेठेतील विपणनाचा आम्हाला अनुभव यातून मिळाला आहे. यासाठी महापालिकेचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य देखील लाभले. यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम महापालिकेने राबवून महिलांना संधी द्यावी अशी अपेक्षा आहे.

पवनाथडी जत्रेत बचत गटांना देण्यात आलेल्या स्टॉल्सच्या सोडती मध्ये विजेत्या ठरलेल्या बचतगटांच्या प्रतिनिधींचा यावेळी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये वुमेन्स पॉवर महिला बचत गटाच्या सुवर्णा सोनवलकर, कांताशक्ती महिला बचत गटाच्या किरण वाघीप, श्रुती महिला बचत गटाच्या दिक्षा जोगदंड, राजमाता जिजाऊ महिला बचत गटाच्या अनिता पवार, संघमित्रा महिला बचत गटाच्या अरुणा जोगदंड, अंबिका महिला बचत गटाच्या मंगल सातपुते यांचा समावेश होता.

महिला बचत गटांनी घेतलेल्या सहभागाबद्दल तसेच पवनाथडी जत्रेला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आणि सहकार्य करणा-या सर्व शासकीय, अशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मंडळे, सामाजिक संस्थांचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी कृतज्ञतापुर्वक आभार मानले.
पवनाथडी जत्रेनिमित्त आयोजित सिनेतारका दीप्ती आहेर यांच्या “लाखात देखणी” हा बहारदार संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम समारोपावेळी सादर झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments