Wednesday, December 6, 2023
Homeमहाराष्ट्रभिडे वाड्याचं संकल्पचित्र तयार, महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा जागर, असं असणार स्मारक

भिडे वाड्याचं संकल्पचित्र तयार, महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा जागर, असं असणार स्मारक

महापालिकेने भिडे वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीवर भर दिला आहे. न्यायालयाने भूसंपादनासाठी पूर्वीचेच निवाडे (अवॉर्ड) कायम ठेवले असले, तरी मोबदला २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार द्यावा लागणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, महापालिकेने पूर्वीच तयार केलेल्या प्राथमिक संकल्पचित्रानुसार पूर्वतयारी सुरू केली आहे.

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिवाजी रस्त्यावरील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्याचे स्मारक करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, त्याला जागामालक व पोटभाडेकरूंनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढत महापालिकेच्या बाजूने निकाल दिला.

महापालिकेने यापूर्वी केलेल्या निवाड्यानुसारच जागेचा मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, हे आदेश देताना २०१३ मध्ये नव्याने आलेल्या भूसंपादन कायद्यानुसार फरकाची रक्कमही द्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे. यासाठी महापालिकेची आधीपासूनच तयारी आहे. याशिवाय कोणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यास महापालिकेने कॅव्हेटही दाखल केले आहे.

दरम्यान, निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश महापालिका व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार जागेचे नव्याने मूल्यांकन केले जात आहे. यानंतर भूसंपादनासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाईल. नोटीसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे प्रत्यक्ष भूसंपादन केले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

संकल्पचित्र तयार

भिडे वाडा येथील स्मारकाचा प्राथमिक संकल्पचित्र महापालिका प्रशासनाने यापूर्वीच तयार करून ठेवले आहे. सुमारे २ हजार चौरस फुटांचा हा कौलारू वाडा पूर्वीप्रमाणेच दुमजली स्वरूपात उभारला जाईल. तळ मजल्यावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा असेल. एका मोठ्या वर्गखोलीत सावित्रीबाई फुले मुलींना शिकवताना दिसतील. याशिवाय तेथे मुख्याध्यापकांचे कार्यालय व एक खोली असेल.पहिल्या मजल्यावर प्रशस्त बहुद्देशीय हॉल, ग्रंथालय, माहिती दर्शक फलक, शिक्षकांची खोली असेल. दुसऱ्या मजल्यावर सभागृह आणि वर्गखोली असेल. वरिष्ठ पातळीवर हा आराखडा मांडून त्याला मान्यता मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होईल, असे सूत्रांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments