Thursday, January 16, 2025
Homeताजी बातमीमराठी माणूस जोडण्याची साखळी या संमेलनामुळे वृद्धिंगत -चंद्रकांत पाटील

मराठी माणूस जोडण्याची साखळी या संमेलनामुळे वृद्धिंगत -चंद्रकांत पाटील

योग्य संधी व धाडस केलं तर मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात यशस्वी होऊन बांधवांच्या साहाय्यासाठी येतो ही आपल्या संस्कृतीची शिकवण असून साखळी जोडण्याचे काम या संमेलनामुळे वृद्धिंगत झाल्याची भावना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ, पिंपरी आयोजित १८व्या जागतिक मराठी संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, गोवा राज्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचे अध्यक्ष संदीप दीक्षित, संमेलनाध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती व संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी.पाटील, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. यशराज पाटील आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.

मराठी माणसाने उद्योग व्यवसायात व नोकरीमध्ये बाहेर जायला लागत असल्याबद्दल न्यूनगंड बाळगून राहू नये. मराठी माणसाच्या विकासासाठी प्रोत्साहन देणे व त्यास आर्थिक सक्षम करण्यासाठी शासन स्तरावर अधिक प्रयत्न करण्यात येईल, असे पाटील यांनी नमूद केले.सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, देशभरात मराठी संस्कृती व मराठीच्या ज्या पाऊलखुणा उमटल्या आहेत त्याचे संवर्धन व जतन करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने लवकरच एक पोर्टल सुरु करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली.

या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी, राज्याच्या वैभवाची ठिकाणे देशभरात असल्याने ती एकत्र मांडण्यासाठी तरुण इतिहासकारांची सूची बनवणे, देशात जिथे जिथे मराठीची स्मारके आहेत तिथे फलक उभारणे, परदेशात ३ कोटी २० लाख भारतीय नोकरी व्यवसायात असल्याने त्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी करणे आणि दिल्लीमध्ये प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी आलेल्या राज्यातील १० हजार मराठी मुलांसाठी दिल्लीत संकुल उभारण्यासाठी मागणी आपल्या भाषणात केली.

यावेळी, संमेलन यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतलेले ‘संवाद’चे अध्यक्ष सुनिल महाजन, गौरव फुटाणे, रविंद्र डोमाळे, प्रशांत पवार, सुदाम भोरे, श्रीकांत कदम तसेच डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्थ डॉ.सोमनाथ पाटील, खजिनदार डॉ.यशराज पाटील यांचा सत्कार मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी या १८ व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करून हे संमेलन यशस्वी करून दाखविल्याबद्दल डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती व या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी.पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

उपस्थित सर्व मान्यवरांचे व पाहुण्यांचे स्वागतपर प्रास्ताविक डॉ.पी.डी.पाटील यांनी तर रामदास फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. पुढील १९वे जागतिक मराठी संमेलन गोवा राज्यात होणार असल्याने त्या संमेलनाच्या सर्व नियोजनाची व स्वागताची जबाबदारी गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी स्वीकारत ज्ञान व संस्कृतीच्या संचिताचा सन्मान करण्याची संधी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

या संमेलनासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेले प्राचार्य रणजित पाटील, डॉ. मोहन वामन, प्रकाश घारे, राजेंद्र वाघ, अरुण काकडे तसेच साहित्य परिषद भोसरी शाखेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी तर, जागतिक मराठी अकादमीचे कार्यचारिणी सदस्य सचिन ईटकर यांनी आभार मानले.

फोटो ओळ- पिंपरी येथील डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ प्रेक्षागृहात १८ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या समारोप समारंभात डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी.पाटील यांचा विशेष सत्कार करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी.पाटील, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे आणि माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments