Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमीजगद्गुरु संत तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्याला प्रारंभ

जगद्गुरु संत तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्याला प्रारंभ

देहू ते भंडारा डोंगर भव्य दिंडी सोहळा संपन्न 

ह. भ. प. मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा

धन्य तुकोबा समर्थ I जेणे केला हा पुरुषार्थ II  हेच वचन मनात ठेवून फुलांनी सजलेल्या पालखीत तुकोबांच्या चांदीच्या पादुका, टाळ – मृदंगाचा गजर, ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष करीत हजारोंच्या उपस्थितीत देहू ते भंडारा डोंगर मार्गावर दिंडी सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले. 

जगद्गुरु तुकोबारायांच्या पंचमवेद गाथा भांडारातील ज्ञानावर अध्यात्मिक पोषण झालेल्या वारकरी बांधवांकडून ३७५ व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ८ ते १७ मार्च २०२५ या दहा दिवसाच्या कालावधीत हे आयोजन करण्यात आले आहे. 

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू यांनी हा मान पुणे जिल्ह्यास दिला आहे. 

श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू हभप मारूतीबाबा कुऱ्हेकर महाराज आणि वारकरी रत्न हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या नेतृत्त्वाने गाथा पारायण सोहळा येत्या ९ मार्च ते १७ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. भंडारा डोंगराच्या पायथ्याला हा सोहळा होत आहे. 

या सोहळ्याची सुरुवात शनिवार दिनांक ८ मार्च रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर अशा भव्य दिंडी सोहळ्याने करण्यात आली. जगद्गुरू तुकोबारायांच्या पाच किलो चांदीच्या पादुकांची देहू येथील मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पादुका सजविलेल्या पालखीत ठेवून टाळ मृदंगाच्या आणि ज्ञानोबा तुकाराम या नामघोषात मंदिराबाहेर आणण्यात आल्या. पालखी समोर दोन शुभ्र अश्व होते. मंदिराबाहेर महिलांनी डोक्यावर कलश आणि तुळसी वृंदावन घेऊन उभ्या होत्या. नंतर पालखी सजविलेल्या रथात ठेवली गेली. रथाला महेंद्रशेठ बाळकृष्ण झिंझुर्डे (२०२३ चे देहू ते पंढरपूर पालखी चे मानकरी ) यांची अत्यंत देखणी खिलारी बैलजोडी होती. पालखी सोबत माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनीही पालखीला भेट देऊन दर्शन घेतले. भंडारा डोंगर मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली), देहू संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे, महोत्सव समितीचे अध्यक्ष निवृत्ती आबा कोळेकर, आप्पासाहेब बागल, काळुराम मालपोटे, जोपाशेट पवार, जगन्नाथ नाटक आदी मान्यवर तसेच जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेर वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाचेन मी सुखें वैष्णवांचे मेळी | 

दिंडी टाळ घोळी आनंदें या || 

दिंडी सोहळ्याचे वैशिष्ट्य

या दिंडी सोहळ्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पाच किलो चांदीच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येकी ३७५ धर्मध्वजधारी, कलशधारी, तुळसीधारी, कीर्तनकार, टाळकरी, मृदंग सेवक, ब्रह्मविणाधारी व तुकाराम नाव असलेले चोपदार सहभागी झाले होते .

संताच्या पादुका घेईन मोचे खांदी |

हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ||

जन्मभूमी देहू ते तपोभूमी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर या मार्गावर जणू भक्तीचा अभंग तुकाराम सेतू उभारला गेला आहे असे दृश्य दिसत होते. ज्या मार्गाने तुकोबाराय नामस्मरण करत ध्यानासाठी भंडारा डोंगरावर जात त्याच मार्गाने आज लाखो वारकरी दिंडी सोहळा घेऊन जाताना तुकोबारायांची अध्यात्मिक श्रीमंती दिसून येत होती.

जगद्गुरु तुकोबारायांच्या पाच किलो चांदीच्या पादुकांची शांतीब्रह्म गुरुवर्य ह. भ. प. मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हभप गुरुवर्य डॉ. नारायण महाराज जाधव यांनी शुभाशीर्वाद दिले.  

वेदवाक्यबाहु उभारीला ध्वज | 

पुजिले देव द्विज सर्वभावे ||

 त्यानंतर कुऱ्हेकर महाराजांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन त्यांच्या आशीर्वचनाने सोहळ्याची सुरुवात झाली. 

गाथा पारायण सोहळ्यातील कार्यक्रम

रविवारपासून (ता. ९ मार्च) ते १७ मार्च या काळात रोज सकाळी काकडा भजन, गाथेचे संगीतमय पारायण,  सकाळी अकरा ते साडेबारा हरी किर्तन, दुपारी तीन ते पाच जगद्गुरु तुकोबारायांचे जीवन चरित्र कथा,  त्यानंतर हरिपाठ व पुन्हा सायंकाळी सहा ते आठ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत आणि अभ्यासू कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन श्रीक्षेत्र देहू संस्थान, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान, श्रीक्षेत्र भामचंद्र आणि घोरवडेश्वर डोंगर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र देहू परिसरातील सर्व तालुके आणि पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका अंतर्गत येणारी सर्व नगरे यात सहभागी आहेत.

उद्याचा कार्यक्रम 

गाथा पारयण सोहळ्यात उद्या (९ मार्च) – हभप रवींद्र महाराज ढोरे (स. ११), हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर (सायं. ६) यांचे कीर्तन होणार आहे. 

संयोजकांच्या वतीने भाविकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यात सर्वांचा सहभाग असावा म्हणून रोज एका तालुक्यातील गावांमधून भाकरींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रोज सायंकाळी प्रत्येक तालुक्यातील खास आमटीचा प्रसाद असेल. 

महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संस्थान, घोरावडेश्वर डोंगर, श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वारकरी संप्रदाय यांचा संयोजनात सहभाग होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments