पुण्यातील वाहतुकीस अडथळा असणारा चांदणी चौकातील पूल शनिवार आणि रविवारीच्या रात्री पाडण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरला रात्री अकरा वाजता पूल पाडण्याचं काम सुरु करण्यात येणार असून ते 2 ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे आणि प्राथमिक स्फोटाचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. हा पूल कशापद्धतीचा स्फोट करुन पाडण्यात येणार आहे, हे या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.
मध्यरात्री दोन वाजता ब्लास्ट करण्याच्या कामासाठी चारशे मीटरच्या अंतरामधे फक्त चार व्यक्ती उपस्थित असणार आहेत. यातील तीन व्यक्ती पूल पाडण्याचे काम करणाऱ्या इडिफाईस इंजिनियरिंग कंपनीचे अधिकारी असतील. तर एक पोलिस अधिकारी असेल. पूल पाडण्याच्या आधी 200 मीटरच्या अंतरावरील सर्वांना बाजूला हटवले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
कंपनी सुमारे 600 किलो स्फोटकं वापरणार…
स्फोटासाठी इमल्शन आणि डिटोनेटिंग फ्यूज वापरणार आहोच. इमल्शन कॅप्सूल प्रत्येकी 25 किलोच्या बॉक्समध्ये येतात आणि आम्ही सुमारे 20 बॉक्स ऑर्डर केले आहेत. याशिवाय सुमारे 50-100 किलो डिटोनेटिंग फ्यूज वापरणार आहोत, असं इडिफाईस इंजिनियरिंग कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
महामार्गाचा काही भाग बंद राहणार…
पूल पाडण्याच्या कालावधीत महामार्गाचा काही भाग बंद राहणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे. साताऱ्याला जाणाऱ्या नागरिकांनी सिंहगड रोड, कोथरुड, वारजे या मार्गाचा वापर करावा. मुंबईच्या दिशेने जायचं असेल तर या कालावधीत वडगावच्या नवले पुलापासून वाहनांना पुणे शहरात प्रवेश करावा लागेल आणि त्या वाहनांना पाषाण किंवा बाणेर मार्गे महामार्गाला जाता येणार आहे. ज्या वाहनांना मुंबईहून सातारला जायचं असेल त्यांना या कालावधीत वाकड- बाणेर मार्गे पुणे शहरात यावं लागेल आणि वडगावचा नवले पूल किंवा कात्रज चौक मार्गे महामार्गाकडे जाता येणार आहे.
काही सेंकदात पूल इतिहासात जमा होणार…
पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केलीय. ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल 10 सेकंदात पाडण्यात येणार आहे. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.