Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमीजगतगुरु संत तुकाराम महाराजांचे चरित्र दीपस्तंभ प्रमाणे

जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे चरित्र दीपस्तंभ प्रमाणे

हभप ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांनी मांडले चरित्र कथन

जग्दगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे चरित्र म्हणजे दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे सांगत ह भ प ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांनी संत तुकाराम महाराजांचे चरित्र कथा स्वरूपात मांडले. 

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यामध्ये रोज दुपारी संत तुकाराम महाराज चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचे प्रमुख आयोजक हभप ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) यांनी कथा सांगितली. कदम माऊलींनी, तुकोबारायांचे चरित्र कोणी कोणी लिहिले? यावर प्रकाश टाकला. स्वतः तुकाराम महाराजांनीच आपल्या एका दीर्घ अभंगात स्वतःचे चरित्र संक्षिप्त रूपात सांगितले आहे. तो अभंग पुढीलप्रमाणे…

याति शूद्र वैश केला वेवसाव। आधी तो हा देव कुळपूज्य।।१।। नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्ही संतीं।।ध्रु.।। संवसारें जालों अतिदु:खें दुखी। मायबाप सेखीं कर्मलिया।।२।। दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान। स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली।।३।। लज्जा वाटे जीवा त्रासलों या दु:खें। वेवसाय देख  तुटी येतां।।४।। देवाचें देऊळ होतें तें भंगलें। चित्तासी जें आलें करावेंसें ।।५।। आरंभीं कीर्तन करीं एकादशी। नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं।।६।। कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियं।।७।। गाती पुढे त्यांचें धरावें धृपद। भावें चित्त शुद्ध करोनियां।।८।। संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊ दिली।।९।। ठाकला तो काहीं केला परउपकार। केलें हें शरीर कष्टवूनी।।१०।। वचन मानिलें नाहीं सुहृदांची । समूळ  प्रपंचें वीट आला।।११।। सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही। मानियेलें नाहीं बहुमतां।।१२।। मानियेला स्वप्नीं गुऊचा उपदेश। धरिला विश्वास दृढ नामी।।१३।। यावरि या जाली कवित्वाची  स्फूर्ति। पाय धरिले चित्तीं विठोबाचे ।।१४।। निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ।।१५।। बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ।।१६।। विस्तारीं सांगतां बहुत प्रकार।होईल उशीर आतां पुरे ।।१७।। आतां आहे तैसा दिसतो विचार। पुढील प्रकार देव जाणे ।।१८।। भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा। कृपावंत ऐसा कळों आलें।।१९।। तुका म्हणे सर्व भांडवल। बोलविले बोल पांडुरंगें।।२०।।

स्वतःचे इतके प्रामाणिक चरित्र क्वचितच कोणी लिहिले असेल.

संत बहिणाबाईंनी सुद्धा तुकोबारायांचे चरित्र लिहिले आहे. खरं तर त्यांची आणि तुकोबारायांची तोपर्यंत भेट झाली नव्हती ; परंतु संत बहिणाबाईंची भक्ती पाहून तुकोबारायांनी त्यांना स्वप्नात काही दृष्टांत दिले होते. त्यावरून त्यांनी त्यांच्या अभंगात तुकोबारायांचे चरित्र मांडले आहे.

संत निळोबा रायांनी सुद्धा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे थोडक्यात आपल्या गुरूंचे म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचे चरित्र थोडक्यात मांडले आहे. तुकोबारायांच्या अत्यंत सविस्तर आणि भक्ती भावाने श्रद्धेने चरित्र लिहिले आहे ते म्हणजे महिपती महाराज यांनी. त्यात त्यांच्या जीवनातील बहुतेक प्रसंग विस्ताराने वर्णन केले आहेत. 

संतांचे चरित्र दीपस्तंभ प्रमाणे कार्य करत असते सर्वसामान्य माणसे ते महान भगवद भक्तांपर्यंत सर्वांनाच ते मार्गदर्शक असते.संतांचे चरण आणि आचरण दोन्ही अनुकरणीय असतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments