Tuesday, October 13, 2026
Homeआंतरराष्ट्रीयएशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णवेध; प्रिथिका प्रदीपच्या कामगिरीने पिंपरी-चिंचवडचा गौरव

एशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णवेध; प्रिथिका प्रदीपच्या कामगिरीने पिंपरी-चिंचवडचा गौरव

एची-नागोया एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कंपाऊंड धनुर्विद्या संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात भारताने चीनचा २३८-२३४ असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

या विजयी भारतीय संघात पिंपरी-चिंचवडची प्रिथिका प्रदीप, ज्योती सुरेखा वेन्नम आणि चिकिता तनीपार्थी यांचा समावेश होता. भारतीय संघाने सुरुवातीपासूनच अचूक निशाणा साधत आघाडी कायम ठेवली आणि अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

भारताचा २३८ गुणांचा स्कोअर हा २०१४ मध्ये दक्षिण कोरियाने नोंदवलेल्या जागतिक विक्रमाशी बरोबरी करणारा ठरला. विशेष म्हणजे, भारतीय महिला कंपाऊंड संघाने एशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियाचा २३४-२३३ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. ज्योती सुरेखा वेन्नम यांचे हे एशियाई क्रीडा स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक ठरले, तर प्रिथिका प्रदीप आणि चिकिता तनीपार्थी यांनी आपल्या पहिल्याच एशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळवला.

पिंपरी-चिंचवडसाठी अभिमानाचा क्षण..

प्रिथिका प्रदीपच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा क्षेत्राचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या माध्यमातून धनुर्विद्येच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या यशामुळे नवी प्रेरणा मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवडमधून घडलेली खेळाडू एशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक जिंकते, ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या यशामुळे महाराष्ट्रासह देशातील युवा धनुर्विद्या खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार आहे.

प्रिथिकाच्या यशामागे प्रशिक्षक कुणाल टावरे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि तांत्रिक प्रशिक्षण, तसेच तिच्या पालकांचा विश्वास, त्याग आणि प्रोत्साहन यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगण्यात आले.

“प्रिथिकातील टॅलेंट शालेय वयातच ओळखले” — सोनल बुंदेले

सोनल बुंदेले, सहसचिव महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना आणि सचिव, पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशन यांनी प्रिथिकाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

“प्रिथिकाची गुणवत्ता आणि तिच्यातील विशेष टॅलेंट शालेय वयात असतानाच ओळखण्याची संधी मला मिळाली. त्या छोट्या वयात तिच्यामध्ये दिसलेली जिद्द, मेहनत, शिकण्याची तयारी आणि खेळाप्रती असलेली निष्ठा आज एशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकापर्यंत पोहोचली आहे, याचा मनापासून आनंद आणि अभिमान आहे,” असे बुंदेले यांनी सांगितले.

या यशामध्ये प्रिथिकाची मेहनत, प्रशिक्षक कुणाल टावरे यांचे मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षण, संधी आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.

प्रिथिका प्रदीपच्या या सुवर्ण कामगिरीने पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय जोडला असून, तिच्या यशामुळे युवा धनुर्विद्या खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments