पुण्यातील केसरीवाड्यात गणेश चतुर्थीच्या २९ दिवस अगोदरच गणरायाचे आगमन झाले आहे. पुण्यातील मानाचा गणपती. गणरायाच्या आगमनाचा सोहळा,
टिळक पंचांगानुसार आज पासून केसरी गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. शनिवार पेठेतील मूर्तिकार महेश गोखले प्रथेप्रमाणे यलयांच्याकडून श्रींची मूर्ती घेतल्यानंतर सकाळी नऊ वाजता पारंपरिक पालखीत गणराया मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात रमणबाग चौकापासून निघाली. प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, ‘केसरी’च्या विश्वस्त व्यवस्थापिका व केसरी गणेशोत्सव कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. गीताली टिळक, केसरी गणेशोत्सवाचे प्रमुख व विश्वस्त-सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, ‘केसरी’च्या विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, रौनक रोहित टिळक तसेच ‘केसरी’चे कर्मचारी व स्नेहीजन सहभागी होणार आहेत.
रमणबाग चौक ते शिंदे पार चौक, ओंकारेश्वर मंदिरापासून वर्तक उद्यान, नारायण पेठ पोलिस चौकीमार्गे मिरवणूक केळकर रस्त्यावरून टिळकवाड्यात प्रवेश करेल. त्यानंतर, सकाळी ११ वाजता ‘केसरी’ गणेशोत्सवाचे प्रमुख डॉ. रोहित टिळक व डॉ. प्रणती टिळक यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल.
२० ते ३० ऑगस्ट दरम्यान हा गणेशोत्सव असेल. टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर सप्टेंबरमध्येदेखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रथेप्रमाणे गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन न करता मूर्ती केसरीवाड्यातील गणेश मंदिरातच ठेवली जाईल. १९ सप्टेंबर (गणेश चतुर्थी) पासून पुन्हा गणेशोत्सवाला सुरुवात होईल. या गणेशोत्सवातही दर वर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. टिळक पंचांगानुसार व्रत वैकल्ये करणार्यांच्या घरी आज गणरायाचे आगमन होईल. अन्य पंचांगाप्रमाणे सध्या निज श्रावण महिना सुरू आहे, तर पुढील महिन्यात १९ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी आहे.