पुणे, दि. २६ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक लढ्याला अभिवादन करणारा ८ वा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून (२६ डिसेंबर) पुण्यात सुरु होत आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने आणि निर्मिती मीडिया सोल्युशन्स यांच्या आयोजनाखाली हा महोत्सव २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत होत आहे.
हा तीन दिवसीय महोत्सव राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आला असून, देश-विदेशातील निवडक ७० चित्रपटांचे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
उद्घाटन सोहळा
महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक व संपादक महावीर जोंधळे यांच्या हस्ते होणार असून, उद्घाटन समारंभाला ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहे.
निळू फुले कार्यकर्ता पुरस्कार
या वर्षीचा मानाचा निळू फुले कार्यकर्ता पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण २८ डिसेंबर रोजी प्रा. सतीश आळेकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून, या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चित्रपट प्रदर्शन व विशेष सत्रे
महोत्सवात ‘मायासभा’ (दिग्दर्शक – राही अनिल बर्वे), ‘जुनूनमा’, ‘घात’ (दिग्दर्शक – छत्रपाल निनावे), ‘सायबर बॉंड’ (दिग्दर्शक – रोहन कांबळे), ‘वाघाची पाणी (Tiger’s Pond)’ यांसह विविध भाषांतील चित्रपट दाखवले जाणार आहेत.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कथेवर आधारित ‘सुलतान’ या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंगही महोत्सवात होणार आहे. तसेच दिग्गज दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या ‘सुबर्णरेखा’ या चित्रपटावर विशेष भाषण व संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
महोत्सव काळात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून त्यामध्ये राही अनिल बर्वे, वीणा जामकर, दीपक दामले, गिरीश पटेल, अंकुर जे. सिंग, आशिष निनुगुकर, समीर दीक्षित, ऋषिकेश भिंगरे, सुनील सुकथंकर, उमेश कुलकर्णी आदींचा समावेश आहे.
आयोजक समिती
अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप ससाने , प्रतिमा परदेशी, नेहा भूकन , निलेश रसाळ यांच्यासह समितीतील सदस्य परिश्रम घेत आहेत.


