गोवा इथे होणाऱ्या ५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाला अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी तसेच गीतकार आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना २०२१ चा इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार दिला जाण्याची घोषणा केली. महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद यांनी ही घोषणा करताना, इफ्फिचा उच्च दर्जा आणि वैभवशाली परंपरा आणि यंदा या महोत्सवातून चित्रपट रसिकांच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण होतील, यांची माहिती दिली.
५२ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फी येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान, गोव्यात संपन्न होणार आहे. सध्याची कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेता, हा महोत्सव मिश्र- म्हणजेच अर्धा प्रत्यक्ष आणि अर्धा ऑनलाईन स्वरुपात आयोजित केला गेला आहे.
इफ्फीमध्ये जगभरातील सर्वोत्तम असे समकालीन आणि क्लासिक म्हणजेच, सर्वकालिक उत्कृष्ट चित्रपट दाखवले जातात. जगभरातील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक, टीकाकार-अभ्यासक आणि चित्रपट रसिकांची मंदियाळी या आठ दिवसांत महोत्सवात बघायला मिळते.विविध चित्रपटांचे प्रदर्शन, सादरीकरण, मास्टर क्लासेस, परिसंवाद, सह-निर्मिती, चर्चासत्रे आणि इतर अनेक भरगच्च कार्यक्रमातून, या महोत्सवात चित्रपट आणि चित्रपट निर्मितीचा आस्वाद घेण्याची संधी मिळते.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना, प्रसाद यांनी सांगितले की Iइफ्फीच्या इतिहासात प्रथमच, नेटफ्लिक्स, अमेझॉन , झी 5 आणि व्हायाकॉम सारखे प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्स बातम्या, मास्टरक्लास आणि इतर कार्यक्रमातून या महोत्सवात सहभागी होत आहेत.
इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय विभागात सुमारे ७३ देशांतील १४८ चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवात सुमारे 12 जागतिक प्रीमियर्स, सुमारे 7 आंतरराष्ट्रीय प्रीमियर्स, २६ आशियायी प्रीमियर्स आणि सुमारे ६४ भारतीय प्रीमियर्स होतील. इफ्फीकडे यावेळी ९५ देशांमधून ६२४ चित्रपट आले होते तर गेल्यावर्षी ६९ देशांमधून चित्रपट आले होते.
जागतिक चित्रपटसृष्टीतील मार्टिन स्कॉर्सेस आणि इस्टेव्हन स्झाबो या दोन प्रमुख दिग्गजांना पहिल्या सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने यंदा सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाच्या संचालकांनी दिली. “दुर्दैवाने, ते महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत, मात्र पुरस्कार स्वीकारणारे त्यांचे व्हिडिओ संदेश प्रसारित केले जातील”.
सेमखोर (दिमासा) या चित्रपटाने इंडियन पॅनोरमा २०२१ चे उदघाटन होणार असून एमी बरुआ यांनी दिग्दर्शित केला आहे. .इफ्फीमध्ये दाखवला जाणारा दिमासा (आसाममधील बोलीभाषा ) मध्ये बनवलेला हा पहिलाच चित्रपट आहे असे प्रसाद यांनी सांगितले. वेद …द व्हिजनरी (इंग्रजी) हा राजीव प्रकाश दिग्दर्शित चित्रपट भारतीय पॅनोरमा विभागाचा उदघाटनाचा नॉन-फीचर चित्रपट आहे.
कार्लोस सौरा दिग्दर्शित ‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’ (एल रे डी टोडो एल मुंडो) चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल आणि हा चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रीमियर देखील असेल. व्हेनिस चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार विजेता चित्रपट ‘द पॉवर ऑफ द डॉग’ हा जेन कॅम्पियन यांनी दिग्दर्शित केला असून, ती यंदाची मिड फेस्ट फिल्म असेल. हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आमच्याकडे आला, त्यांनी चित्रपटाच्या भारतीय प्रिमिअरची व्यवस्था केल्याची माहिती संचालकांनी दिली.
कान्स चित्रपट महोत्सवात ग्रँड प्रिक्स जिंकणारा असगर फरहादीचा ‘अ हिरो’ चित्रपटाने ५२ व्या इफ्फी चा समारोप होईल. सध्या सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून खास तयार केलेले सुमारे १८ चित्रपट या महोत्सवात सादर केले जातील.इराणी चित्रपट निर्मात्या रख्शान बानितेमाद यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय परीक्षक (ज्युरी ) महोत्सवात सहभागी होण्यासाठी येणार असल्याची माहिती महोत्सव संचालकांनी दिली.
इफ्फी ५२ मध्ये पहिल्यांदा प्रतिनिधींना पॅरिसस्थित प्रसिद्ध ‘गॉबेलिन्स’ या इमेज अँड आर्टस् प्रशिक्षण संस्थेच्या 3 दिवसांच्या विशेष वर्गाचा आभासी पद्धतीने लाभ घेता येईल. इफ्फीद्वारे प्रथमच ओटीटी मंचांसोबतच्या समन्वयामुळे नेटफ्लिक्सतर्फे आयोजित या विशेषवर्गाचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा विशेष वर्ग विनामूल्य असल्याची माहिती संचालकांनी दिली. यंदा इफ्फीदरम्यान प्रथमच ब्रिक्स चित्रपट महोत्सवआयोजित करण्यात आला आहे.ब्राझील , रशिया ,भारत ,चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांतील चित्रपटांचे विशेष पॅकेज यात असेल.
यावर्षीच्या इफ्फी चा एक वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रम “७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो” ची माहिती प्रसाद यांनी यावेळी दिली. या उपक्रमाची संकल्पना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची आहे. चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख प्रतिभावान व्यक्तींना इफ्फीत सहभागी करून घेण्यासाठी आमंत्रित करून त्यांना जाणकारांशी, चित्रपट रसिकांशी, जोडण्याची ही संकल्पना आहे. “ यासाठी देशभरातून आलेल्या ४०० हून अधिक अर्जांनी आम्ही भारावून गेलो आहोत. त्यापैकी ७५ जण इफ्फीमध्ये आमचे पाहुणे म्हणून येणार आहेत. त्यांना इथे सर्वांना भेटायला मिळेल. यामुळे त्यांना विविध चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल.”
प्रख्यात कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार यांना ५२व्या इफ्फीमध्ये आदरांजली वाहिली जात असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली .’जेम्स बाँड’चे या चित्रपट मालिकेतील पहिले अभिनेते सर शॉन कॉनरी यांना विशेष आदरांजली यंदाच्या महोत्सवात वाहण्यात येणार आहे.
सलमान खान, रणवीर सिंग, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, श्रद्धा कपूर आणि इतर कलाकारांचा समावेश असलेल्या रंगतदार कार्यक्रमाने इफ्फीचे उद्घाटन होईल. करण जोहर आणि मनीष पॉल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत, अशी माहिती महोत्सव संचालकांनी दिली. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाचे उपाध्यक्ष सुभाष फलदेसाई आणि ईएसजीचे सीईओ तारिक थॉमस हे या माध्यम संवादाला उपस्थित होते.