जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६,७, व ८ जानेवारी २०२३ या कालावधीत ‘शोध मराठी मनाचा’ २०२३ हे १८ वे जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे येथे हे तीन दिवसीय संमेलन रंगणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.ज्ञानेश्वर मुळे भूषवणार असून, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आहेत.
या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण कोरिया, नेदरलँड, मॉरिशस, न्यूझीलंड, या देशांमधील मराठी मान्यवर सहभागी होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व्यंगचित्रकार राज ठाकरे, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सहभाग, अभिनेते व दिग्दर्शक नागराज मंजुळे, सुबोध भावे, प्रवीण तरडे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे यांच्याशी संवाद, ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’, मुलाखती, परिसंवाद, चित्र- शिल्प, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम यामध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
या संमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ.प्रमोद चौधरी यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार २०२३’ आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना विवा चॅरिटेबल ट्रस्ट, वसई- ‘जागतिक मराठी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी भाई जयंत पाटील, हितेंद्र ठाकूर, नागराज मंजुळे, उद्योगपती अरुण फिरोदिया, हणमंतराव गायकवाड आणि परदेशातील व महाराष्ट्रातील निमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सूत्रसंचालन स्नेहल दामले करतील अशी माहिती या संमेलनाचे स्वागताध्य डॉ. पी. डी. पाटील व जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली.
अमेरिकेत खासदार झालेले पहिले मराठी व्यक्ती असलेले श्रीनिवास ठाणेदार यांनादेखील संमेलनानंतर जानेवारी महिन्याच्या अखेरीस ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, कृषी, शिक्षण आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटविणाऱ्या परदेशातील मराठी व भारतातील मान्यवरांचा सहभाग हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे.
उद्घाटन सोहळ्यापूर्वी दिनांक ६ जानेवारी रोजी दुपारी २:०० वाजता ‘समुद्रापलीकडे’- भाग १ हा परदेशस्थ मान्यवरांशी संवादाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला हैद्राबाद (तेलंगणा राज्य) पोलीस आयुक्त महेश भागवत यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये मनोज शिंदे (अमेरिका), आर्या तावरे (ब्रिटन), भरत गीते (जर्मनी), राजेश बाहेती (दुबई), रोहिदास आरोटे (दक्षिण कोरिया), वृंदा ठाकूर (नेदरलँड्स), विद्या जोशी (अमेरिका), ब्रायन परेरा (ऑस्ट्रेलिया) आदी मान्यवर सहभागी होणार असून त्यांच्याशी सचिन इटकर संवाद साधतील.
दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी ३:३० वाजता प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व उद्योगपती डॉ.प्रमोद चौधरी यांची मुलाखत होणार असून त्यांच्याशी प्रा.मिलिंद जोशी संवाद साधतील. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत.
सायं. ६:३० वाजता ‘कलावंतांच्या सामाजिक जाणिवा’ या कार्यक्रमात दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे, अभिनेते आकाश ठोसर आणि अभिनेते सयाजी शिंदे सहभागी होणार आहेत.
शनिवार दिनांक- ७ जानेवारी २०२३
या संमेलनात शनिवार दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता होणाऱ्या ‘आकाशाशी जडले नाते…’ या कार्यक्रमाला नवी दिल्ली येथील अखिल भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात आमोद केळकर (अमेरिका) आणि नीलम इंगळे (मुंबई) सहभागी होणार असून त्यांच्याशी मंदार भारदे संवाद साधणार आहेत. सकाळी ११:०० वाजता प्रसिद्द अभिनेते व दिग्दर्शक सुबोध भावे यांच्याशी ‘माझा चित्रप्रवास’ हा दृक्श्राव्य संवादात्मक कार्यक्रम होणार असून त्यांच्याशी मिलिंद कुलकर्णी संवाद साधतील.
दुपारी १२:०० वाजता, ‘समुद्रापलीकडे’ भाग – २ हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये असंत गोविंद (मॉरिशस), हेमा चारमाले (अमेरिका), रेश्मा सांभारे (अमेरिका), डॉ.राहुल तुळपुळे (दुबई), कौस्तुभ देशपांडे (अमेरिका), दयानंद देशपांडे (न्यूझीलंड), मिहीर शिंदे (ऑस्ट्रेलिया), सागर बाबर (अमेरिका) सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी महेश केळुसकर आणि डॉ. शैलेश गुजर संवाद साधतील.
दुपारी ३:०० वाजता ‘जागतिक आरोग्यव्यवस्था आणि भारत’ या विषयावरील कार्यक्रमात पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर (पुणे), डॉ. श्रीकांत चिंचालकर (कॅनडा), डॉ. रवी गोडसे (अमेरिका), डॉ. मकरंद जावडेकर (अमेरिका) सहभागी होणार असून त्यांच्याशी डॉ. शंतनु अभ्यंकर संवाद साधतील.
दुपारी ४:३० वाजता, ‘बीज अंकुरले’ या कार्यक्रमात डॉ. सी. डी. मायी, शेखर गायकवाड, किशोर गोरे (अमेरिका), अमित केवल (फ्रान्स), विलास शिंदे, सुधीर भोंगळे सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी सुनील चव्हाण आणि विजय चोरमारे संवाद साधतील.
संध्याकाळी ६:३० वाजता ‘चित्र- शिल्प- काव्य’ या कार्यक्रमात ज्येष्ठ वात्रटिकाकार फ. मु. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, मीनाक्षी पाटील, अंजली कुलकर्णी, वैभव जोशी, सिसिलिया कार्व्हालो, कल्पना दुधाळ, भरत दौंडकर, साहेबराव ठाणगे, सुनिती लिमये, प्राजक्ता पटवर्धन, वैशाली पतंगे, शोभा रोकडे, नितीन देशमुख, नारायण पुरी, लता ऐवळे, मृणालिनी कानिटकर, अनुजा जोशी, प्रशांत मोरे, प्रकाश होळकर, रमजान मुल्ला, सतीश पिंपळगावकर, पुरुषोत्तम सदाफुले, विनायक कुलकर्णी, हर्षदा कोळपकर (रचना चित्र), प्रा. सुरभी गुळवेलकर (व्यक्तिचित्र), सुप्रिया शिंदे (शिल्पकार) हे सहभाग घेणार आहेत. या कार्यक्रमात मराठी भाषेच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले ज्येष्ठ पत्रकार रजनीश राणे (मुंबई) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश केळुसकर आणि श्रीकांत कदम करतील.
रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३
संमेलनाच्या तिसऱ्या व अखेरच्या दिवशी सकाळी १०:०० वाजता ‘सरस्वतीच्या मंदिरात’ कार्यक्रम संपन्न होत आहे. यामध्ये ज्येष्ठ शिक्षणतज्ञ जगन्नाथ पाटील, सिम्बायोसीस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र. कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, माधवी आमडेकर (लंडन), डॉ. नरेश बोडके (दिल्ली) आणि राजेश पांडे सहभागी होणार असून त्यांच्याशी मिलिंद कुलकर्णी संवाद साधतील.
सकाळी ११ वाजता ‘व्यंग, वास्तव आणि राजकारण’ या परिसंवादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्याशी प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर संवाद साधतील.
दुपारी २:०० वाजता अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी ‘देऊळबंद ते सरसेनापती हंबीरराव- एक प्रवास’ यावर संवाद कार्यक्रम होणार असून त्यांच्याशी विनोद सातव संवाद साधतील.
दुपारी ३:०० वाजता ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ या परिसंवादात गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप आणि ज्येष्ठ पत्रकार सागर जावडेकर सहभागी होतील. त्यांच्याशी महेश केळुसकर संवाद साधतील.यानंतर सायं ५:०० वाजता संमेलनाचा समारोप सोहळा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
या जागतिक मराठी संमेलनासाठी प्रवेशिका आवश्यक असून या प्रवेशिका डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे या कार्यक्रम स्थळी उपलब्ध असतील