१९ सप्टेंबर २०२०,
करोना व्हायरसविरुद्ध संपूर्ण जग लढत आहे. अशा महासंकट काळात क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद देणारी आयपीएल स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत पुन्हा एकदा दिग्गज महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे कर्णधार जेतेपदासाठी मैदानात उतरतील. सर्वांची नजर असेल तरी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्या पहिल्या लढतीवर.
कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमी ज्या स्पर्धेची वाट पाहत होते तो क्षण अखेरीस जवळ आलेला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होते आहे. अबु धाबीच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगेल. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या स्पर्धेचं आयोजन युएईत केलं आहे. स्पर्धेदरम्यान विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून Bio Secure Bubble तयार करण्यात आलेलं आहे. सर्व संघ गेला महिनाभर या स्पर्धेसाठी कसून तयारी करत आहे.
भारतात सातत्याने करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जात आहे. IPLच्या इतिहासात प्रथम प्रेक्षकांशिवाय संपूर्ण स्पर्धा होणार आहे. या काळात चित्रपट आणि क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएल खास अशी ठरणार आहे.
चेन्नईच्या संघासाठी गेल्या काही दिवसांचा काळ फारसा चांगला गेला नाही. दोन खेळाडूंना झालेली करोनाची लागण, हरभजन-रैना यांनी घेतलेली माघार यामुळे चेन्नईसमोर आपला संघ नव्याने उभारण्याची वेळ आलेली आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सलाही आपला प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगाची उणीव भासणार आहे. यंदा संपूर्ण हंगाम युएईत खेळवला जाणार असल्यामुळे सर्व संघांना विजयाची समान संधी असल्याचं बोललं जातंय.