दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयामध्ये डेप्युटी सेक्रेटरी असल्याची बतावणी करून पुण्यातल्या बाणेर येथे सामाजिक कार्यक्रमत वावरणाऱ्या तोतया आय.ए, एस अधिकाऱ्याला युनिट १ च्या पोलिसांनी अटक केली आहे. नेमका हा असा प्रकार का करत होता ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली असून चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासुदेव निवृत्ती तायडे (वय ५४ रा. फ्लॅट न ३३६, रानवार रोहाऊस तळेगाव दाभाडे,) असे या तोतया आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार,औंध पुणे बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मु काश्मीरला मदतीसाठी पाठवण्याकरिता रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजक वेळी विरेन शहा , सुहास कदम, पी के गुप्ता व इतर ट्रस्टी व सदस्य असे हजर होते. या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणुन आलेले एक इसम ज्यांनी आपले नाव डॉ. विनय देव असे सांगितले असून ते स्वत: आय. ए. एस. आहेत आणि ते डेप्युटी सेक्रेटरीच्या पदावर पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असून ते गोपनीय काम करीत असल्याची खोटी माहिती कार्यक्रमातील उपस्थितांना दिली. मात्र, दिलेली माहिती ही संशयास्पद वाटल्याने संस्थेचे पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली असता वासुदेव तायडे यांच्याबाबत त्यांना संशय वाटला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दिली.
त्या आधारे युनिट १ च्या अधिकाऱ्यांनी ३० जानेवारीला डॉक्टर विनय देव नावाच्या व्यक्तीला तळेगाव येथे राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असताना त्याने आपले नाव वासुदेव निवृत्ती तायडे असे सांगितले. तायडे यांच्याविरुद्ध भादवि कलम ४१९,१७० अन्वये चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, मा. अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर, मा. सुनील पवार सहाय्यक पोलीस आयुक्त सो गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट १ गुन्हे शाखेतील शब्बीर सय्यद, सपोनिरी कवठेकर, पोलीस अंमलदार राहुल मखरे, इम्रान शेख, अभिनव लडकत व निलेश साबळे यांच्या पथकाने केली आहे.