जम्मू काश्मीरमधून धक्कादायक बातमी हाती आली आहे. श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी सशस्त्र पोलीस दलाच्या बसवर हल्ला केला असून या हल्ल्यात २ पोलीस शहीद झाले आहेत तर १२ पोलीस जखमी आहेत. त्यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
हा हल्ला श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ येथे आज(सोमवार) सायंकाळी झाला. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र पोलीस बटालियनच्या बसवर हा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी या बस वर मोठ्याप्रमाणात गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.अचानक झालेल्या हल्ल्यामुळे १४ पोलीस जखमी झाले आहेत. त्यातील दोन पोलीस शहीद झाले असून बाकी जखमींवर आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
तसेच, प्राप्त माहितीनुसार दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांनी बसवर बेछूट गोळीबार केला. जम्मू-काश्मीर पोलिसांची ही बस बुलेटप्रुफ नव्हती. त्यामुळे या हल्ल्यात पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले. हल्ला झाल्यानंतर पोलीस दलाने या संपूर्ण परिसरास वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू केली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.