मी आत्ताच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून बाहेर आलो आहे, सर्वांनी मला हप्ता द्यायचा, अशी धमकी देत कोयता हातात घेऊन रस्त्यावरील लोकांच्या अंगावर धावून जाणा-या भाईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरीगावात घडली.
सलमान शेख (वय ३०, रा. काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुरक्षारक्षक प्रकाश बहादूर शहा (वय २४, रा. पिंपरीगाव) याने पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी सलमान हा हातामध्ये धारधार कोयता घेऊन सार्वजनिक रस्त्यावर आला. सगळ्यांनी मला घाबरुन रहायचे, मला सलमान भाई म्हणतात. आताच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून बाहेर आलो आहे. सर्वांनी मला हप्ता द्यायचा, नाही तर एकेकाला तोडून टाकीन अशी धमकी देत होता. रस्त्याने येणा-या जाणा-या लोकांच्या अंगावर धाऊन जात होता. सलमान कोयता घेऊन अंगावर येताच फिर्यादी प्रकाश घाबरुन पळून जावून आडबाजुला लपला. तसेच सलमनाच्या दहशतीला घाबरुन परिसरातील लोक इकडे-तिकडे जीव मुठीत धरुन धावत होते.