५ जुलै २०२१,
पिंपरी-चिंचवड शहरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे गुंडांच्या दहशतीचा काळजाचा थरकाप उडविणारा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरताना दिसत आहेत. ते समोर दिसेल त्याच्यावर वार करीत आहेत. सांगवी परिसरातील पिंपळे निळखमध्ये काल रात्री हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
दारूच्या नशेत असलेले हे तरुण आपल्या हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यामध्ये गोंधळ घालत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहन चालकांना धमाकून त्यांच्यावर वार करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान या धक्कादायक प्रकारात प्रतीक खरात आणि चेतन जावरे नामक तरुणांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबधित दोन्ही तरुण फरार झाले आहेत आणि त्यातील एका व्यक्तीविरोधात एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आणि दहशत पसरविण्यासाठी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिली आहे.
अशा प्रकारे दहशत माजविण्याऱ्या या दोन्ही तरुणांवर या आधी कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा ते कोणत्या गुन्हेगार टोळीशी संबधितही नाहीत. त्यांनी दारूच्या नशेत हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. असं असलं तरीही या आरोपींनी त्यांच्याकडील धारदार शस्त्राने एकाच्या डोक्यावर जबर वार केल्याने तो व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. रस्त्यांवर गर्दी असतानाही हे गुंड धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. अशा वेळी पोलीस यंत्रणा कुठे होती? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.