सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकात भीषण अपघात झाला आहे. एक भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना समोर आली आहे.
सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकात एक भरलेला केमिकलचा टँकर पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकर आणि दोन दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे
मिळालेल्या माहितीनुसार, हा टँकर सोलापूरच्या दिशेने निघाला होता. यावेळी वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर दुभाजक तोडून रस्त्यावर आला आणि पलटी झाला. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने पुढील अनर्थ टळला आहे. चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने टँकर चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी तात्काळ रुग्णवाहिका, स्थनिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून खबरदारीचा उपाय म्हणून चालकाची चौकशी केली.
पुणे – सोलापूर महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. हा अपघात टँकर चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याची माहिती समोर आली असून या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे.