Thursday, January 16, 2025
Homeताजी बातमीचिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकांसाठी आणलेल्या २४५ मतदार यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड, मतदान...

चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकांसाठी आणलेल्या २४५ मतदार यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड, मतदान यंत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परत

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकांसाठी १७२० मतदान यंत्रे पुण्यात यापूर्वीच दाखल झाली आहेत. या यंत्रांचे प्रत्यक्ष मतदान घेऊन यशस्वी प्रात्यक्षिक (मॉक पोल) जिल्हा निवडणूक शाखेकडून घेण्यात आले. या प्रात्यक्षिकात तांत्रिक बिघाड असलेली यंत्रे पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवून देण्यात आली आहेत.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा, तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. मंगळवारी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येऊन उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात करण्यात आली. या दोन्ही मतदारसंघांसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेकडून रविवारी (२९ जानेवारी) मतदानाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्याकरिता नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पाचारण करण्यात आले होते. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.

दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे शहर प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, देशमुख यांची बदली करण्यात आली असून शहर प्रांत अधिकारी म्हणून स्नेहा किसवे देवकाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे देवकाते कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, असेही भोसले यांनी सांगितले.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी पुण्यात एकूण १७२० मतदान यंत्रे देण्यात आली होती. त्यामध्ये बॅलेट युनिट, कण्ट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट या यंत्रांचा समावेश होता. मतदान प्रात्यक्षिकानंतर यांपैकी १६६४ बॅलेट युनिट, १६१७ कण्ट्रोल युनिट आणि १६२० व्हीव्हीपॅट यंत्रे सुस्थितीत आहेत. तर, ५४ बॅलेट युनिट, ९७ कण्ट्रोल युनिट आणि ९४ व्हीव्हीपॅट यंत्रांत तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. बिघाड असलेली यंत्रे पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवून देण्यात आली आहेत, असेही भोसले यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments