Friday, July 10, 2026
Home Blog

पालखी सोहळ्यात वारकऱ्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दोन महिलांना रंगेहात अटक; गुन्हे शाखा युनिट-३ची उल्लेखनीय कामगिरी

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या गर्दीचा फायदा घेत भाविकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने रंगेहात अटक केली. आरोपींकडून १३ ग्रॅम वजनाचे, सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तैनात करण्यात आली होती. ही पथके आळंदीपासून बोपखेल फाट्यापर्यंत पालखीसोबत साध्या वेशात गस्त घालत होती.

दरम्यान, पालखी दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेत हिसकावून चोरी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पथकातील पोलीस कर्मचारी दिलीप राठोड व स्वप्नील महाले यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांना घटनास्थळीच ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपी महिलांपैकी एकीने आपले नाव नयना विष्णू काळे (वय २०, रा. धारेश्वर, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. तिच्याकडून चोरीस गेलेले १३ ग्रॅम वजनाचे, १.५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. फिर्यादी सुनीता नारायणराव राऊत (वय ५०, रा. चव्होली फाटा) यांच्या तक्रारीवरून दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सांग्राम आवाड तसेच सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुदर्शन साईदास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार सुरेखा बोरसे, बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोहोडे, दिलीप राठोड, निखिल फापाळे आणि स्वप्नील महाले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर शिवसेनेचे महापालिकेवर धडक आंदोलन; ‘संजय कुलकर्णींना अटक करा’, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

महापालिका मुख्यालय घोषणांनी दणाणले; चौकशी नव्हे, थेट निलंबन आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेनेने शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयावर जोरदार आंदोलन केले. “दोषींवर कारवाई करा”, “निष्काळजी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे बंद करा” आणि “संजय कुलकर्णींना अटक करा” अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला.

मोशी येथील दुर्घटना ही नैसर्गिक नसून प्रशासनाचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि नियोजनशून्य कारभाराचा परिणाम असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेविका सुलभा उबाळे, विश्वजित बारणे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी केले.

शिवसेनेने पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी केली. दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना आणखी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

आंदोलनादरम्यान बोलताना नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या, “महापालिका केवळ चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे. नागरिकांच्या जीवापेक्षा अधिकारी आणि ठेकेदारांना संरक्षण देणारी व्यवस्था आता बंद झाली पाहिजे. दोषींना अभय देण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना अधिक तीव्र आंदोलन करेल.”

दरम्यान, शहरात वारंवार घडणाऱ्या दुर्घटना, नागरिकांच्या सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर वेळेत कारवाई न होण्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. मोशी दुर्घटनेनंतर हा रोष आणखी वाढला असून, दोषींना शिक्षा मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

मोशी कचरा डेपो परिसरात बचावकार्य सुरू असतानाच दुसरीकडे राजकीय वातावरणही तापले आहे. शिवसेनेच्या आंदोलनामुळे प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला असून, या प्रकरणात महापालिका आणि पोलीस प्रशासन पुढे कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

मोशी कचरा डेपो दुर्घटना : एकाचा मृत्यू; आठ जणांना बाहेर काढण्यासाठी मलबा हटविण्याचे युद्धपातळीवर काम सुरु

पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपोजवळ झालेल्या इमारत दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अंदाजे आठ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीभोवतीचा मलबा हटवून जवानांना सुरक्षित प्रवेश मिळावा, तसेच इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, महापालिका अग्निशमन विभाग, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून बचाव मोहिमेचा आढावा घेतला.

बचावकार्य अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देत विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यावेळी भारतीय सैन्य दलाचे कर्नल आर. के. तिवारी, एनडीआरएफचे सेकंड कमांड दीपक तिवारी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एनडीआरएफचे सेकंड कमांड दीपक तिवारी यांनी सांगितले की, इमारतीमध्ये सुरक्षितपणे प्रवेश करणे सध्या कठीण होत आहे. त्यामुळे प्रथम इमारतीभोवतीचा मलबा हटविण्याचे आणि धोकादायक ठरत असलेला अस्थिर भाग सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर जवानांसाठी सुरक्षित मार्ग तयार करून आत अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

सध्या तीन जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या सहाय्याने दुर्घटनास्थळी मलबा हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. इमारत एका बाजूने झुकलेली असल्याने आणि बांधकामाचा काही भाग कोसळल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. मात्र, तांत्रिक बाबींचा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “बचावकार्यातील प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आवश्यक ती सर्व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. इमारतीचा अस्थिर भाग स्थिर केल्यानंतर जवानांना सुरक्षितपणे आत पाठवून अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याची कार्यवाही केली जाईल. एनडीआरएफ, भारतीय सेना, महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या समन्वयातून ही मोहीम सुरू असून अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”

राज्यातील मागासवर्गीय समाजावरील वाढते अत्याचार अत्यंत चिंताजनक; आमदार अमित गोरखे यांनी पावसाळी अधिवेशनात वेधले सरकारचे लक्ष

दोषींवर कठोर कारवाई करा – आमदार अमित गोरखे यांची मागणी

राज्यात मागासवर्गीय समाजावरील सातत्याने वाढत चाललेल्या अत्याचारांच्या अत्यंत गंभीर आणि अमानुष घटनांवर आज विधिमंडळात भाजप आमदार अमित गोरखे यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ द्वारे सरकारचे लक्ष वेधले. जळगाव, बीड, सोलापूर आणि माळशिरस येथे घडलेल्या सलग घटनांनी राज्यातील मागासवर्गीय समाजाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केला असून, सरकारने यावर तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी आज सभागृहात केली.

मागासवर्गीय समाजावर अत्याचार 

सभागृहाचे लक्ष वेधताना आमदार अमित गोरखे यांनी राज्यातील घटना सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या. जळगावमध्ये मार्च महिन्यात एका मागासवर्गीय युवकाने उच्चजातीय मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून त्याला नग्न करून लोखंडी रॉडने अत्यंत निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. बीड शहरात मे २०२६ मध्ये मागासवर्गीय समाजातील युवक उमेश दळवी यांची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली. नुकतेच सोलापूर जिल्ह्यात मागासवर्गीय  चौंडेश्वरवाडी या गावात दिवसाढवळ्या  शेतकरी महिला उषा विजय साठे यांची शेतात काम करत असताना सचिन देशमुख नावाच्या व्यक्तीने गोळी झाडून हत्या केली. इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे एका १६ वर्षीय मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली.

आमदार अमित गोरखे यांची प्रमुख भूमिका  

या सर्व प्रकरणांतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून ‘अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत’ (Atrocity Act) प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. पीडित कुटुंबांना तात्काळ न्याय देऊन आवश्यक ती आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी. मागासवर्गीय समाजात निर्माण झालेली भीतीची भावना दूर करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृहविभागाने या संवेदनशील प्रकरणावर तात्काळ निवेदन करावे. कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी भूमिका आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात मांडली आहे. 

मागासवर्गीय समाजाविरुद्ध असुरक्षिततेचे गंभीर चित्र 

या सलग घडलेल्या घटना केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, मागासवर्गीय समाजाविरुद्ध वाढत्या जातीय मानसिकतेचे आणि असुरक्षिततेचे गंभीर चित्र अधोरेखित करणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले. तसेच, या बीड प्रकरणांत पीआय शितलकुमार बल्लाळ यांच्याकडून झालेल्या गंभीर दप्तर दिरंगाईचा (निष्काळजीपणाचा) निषेध करत त्यांच्यावरही तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

दोषींवर कठोर कारवाई करा – आमदार अमित गोरखे यांची मागणी

राज्यात मागासवर्गीय समाजावरील सातत्याने वाढत चाललेल्या अत्याचारांच्या अत्यंत गंभीर आणि अमानुष घटनांवर आज विधिमंडळात भाजप आमदार अमित गोरखे यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ द्वारे सरकारचे लक्ष वेधले. जळगाव, बीड, सोलापूर आणि माळशिरस येथे घडलेल्या सलग घटनांनी राज्यातील मागासवर्गीय समाजाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केला असून, सरकारने यावर तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी आज सभागृहात केली.

मागासवर्गीय समाजावर अत्याचार 

सभागृहाचे लक्ष वेधताना आमदार अमित गोरखे यांनी राज्यातील घटना सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या. जळगावमध्ये मार्च महिन्यात एका मागासवर्गीय युवकाने उच्चजातीय मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून त्याला नग्न करून लोखंडी रॉडने अत्यंत निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. बीड शहरात मे २०२६ मध्ये मागासवर्गीय समाजातील युवक उमेश दळवी यांची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली. नुकतेच सोलापूर जिल्ह्यात मागासवर्गीय  चौंडेश्वरवाडी या गावात दिवसाढवळ्या  शेतकरी महिला उषा विजय साठे यांची शेतात काम करत असताना सचिन देशमुख नावाच्या व्यक्तीने गोळी झाडून हत्या केली. इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे एका १६ वर्षीय मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली.

आमदार अमित गोरखे यांची प्रमुख भूमिका  

या सर्व प्रकरणांतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून ‘अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत’ (Atrocity Act) प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. पीडित कुटुंबांना तात्काळ न्याय देऊन आवश्यक ती आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी. मागासवर्गीय समाजात निर्माण झालेली भीतीची भावना दूर करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृहविभागाने या संवेदनशील प्रकरणावर तात्काळ निवेदन करावे. कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी भूमिका आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात मांडली आहे. 

मागासवर्गीय समाजाविरुद्ध असुरक्षिततेचे गंभीर चित्र 

या सलग घडलेल्या घटना केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, मागासवर्गीय समाजाविरुद्ध वाढत्या जातीय मानसिकतेचे आणि असुरक्षिततेचे गंभीर चित्र अधोरेखित करणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले. तसेच, या बीड प्रकरणांत पीआय शितलकुमार बल्लाळ यांच्याकडून झालेल्या गंभीर दप्तर दिरंगाईचा (निष्काळजीपणाचा) निषेध करत त्यांच्यावरही तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व १० प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व; वाचा कोणाची झाली अध्यक्षपदी निवड

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावर भाजपच्या नगरसदस्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (९ जुलै) अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. या कालावधीत भाजपकडून प्रत्येक प्रभागासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही.

यामुळे सर्व १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसदस्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, या निकालाची औपचारिक घोषणा १३ जुलै रोजी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दिली.

प्रभाग समिती अध्यक्षपदी निश्चित झालेल्या नगरसदस्यांची यादी :

1. प्रभाग अ (राजगड) – अर्चना करांडे

2. प्रभाग ब (सिंहगड) – मंदार देशपांडे

3. प्रभाग क (विजयदुर्ग) – निखिल बोऱ्हाडे

4. प्रभाग ड (देवगिरी) – सविता खुळे

5. प्रभाग इ (शिवनेरी) – अर्चना सस्ते

6. प्रभाग फ (तोरणा) – शिवानी नरळे

7. प्रभाग ग (पुरंदर) – मनीषा पवार

8. प्रभाग ह (प्रतापगड) – तृप्ती कांबळे

9. प्रभाग ज (रायगड) – आरती चोंधे

10. प्रभाग ल (लोहगड) – रेखा देवकर

या निवडीमुळे महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांवर भाजपचे पूर्ण वर्चस्व कायम राहिले आहे. प्रभाग समित्यांच्या माध्यमातून स्थानिक विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि विविध प्रशासकीय विषयांवर निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी या नव्या अध्यक्षांवर असणार आहे. १३ जुलै रोजी अधिकृत घोषणा झाल्यानंतर सर्व नवनियुक्त अध्यक्ष पदभार स्वीकारणार आहेत.

मोशी कचरा डेपो दुर्घटना; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू – बचावकार्यादरम्यान ६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले

पिंपरी, दि. ८ जुलै २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो येथे दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये अंदाजे २३ नागरिक अडकले होते. त्यातील सुरुवातीस ५ नागरिक सुखरुप बाहेर आले. इमारतीत अडकलेल्या उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ), भारतीय सेना दल, महापालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या बचावकार्य राबविले. शर्तीच्या प्रयत्नानंतर इमारतीत अडकलेल्या ६ नागरिकांना सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित अंदाजे १२ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. 

बचावकार्यादरम्यान बाहेर काढलेल्या नागरिकांना पुढील उपचारार्थ महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसेच नजिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

घटनास्थळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे प्रत्यक्ष उपस्थित असून सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. 

सध्या अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व उपलब्ध मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. अग्निशमन विभागाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ) चे जवान तसेच वैद्यकीय पथके घटनास्थळी कार्यरत असून, जेसीबी आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे आणि अडकलेल्या नागरिकांच्या बचावकार्याचे काम सुरू आहे. 

यावेळी गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात गेल्या २ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यात कचऱ्याचा ढीग वाहून इमारतीवर कोसळल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये अडकलेल्या २३ नागरिकांपैकी ५ नागरिक सुरुवातीला बाहेर पडले. उर्वरित अडकलेल्या १८ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू होते, यामध्ये ६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अंदाजे १२ नागरिकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू असून आत अडकलेल्या ३ नागरिकांसोबत संवाद सुरू आहे. त्यांच्या पायावर मलबा पडला असल्याने तो हटवून त्यांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय इतर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. निश्चितपणे त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहे. सकाळपर्यंत हे बचावकार्य पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. 

बचावकार्यात सुखरुप बाहेर पडलेल्या व्यक्तींची नावे –

सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह यांना बचावकार्यादरम्यान सुखरुप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. तर अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार, श्री बाला हे घटना घडल्यानंतर सुखरुप बाहेर पडले.

मोशीत वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पावर दुर्घटना; कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून इमारत जमीनदोस्त, १४ कर्मचारी अडकल्याची भीती

ग्निशामक दल, पोलीस, एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य; जखमी कर्मचाऱ्यावर उपचार सुरू

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात बुधवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. प्रकल्पाच्या मागील बाजूस साठवून ठेवलेला कचऱ्याचा प्रचंड ढिगारा अचानक इमारतीवर कोसळल्याने तीन मजली प्रशासकीय इमारतीचा मोठा भाग जमीनदोस्त झाला. या दुर्घटनेत किमान १४ कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, एका गंभीर जखमी कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. मोशी कचरा डेपोजवळील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पामध्ये कचऱ्यापासून वीज निर्मितीचे काम केले जाते. प्रकल्पाच्या तीन मजली इमारतीत प्रशासकीय कार्यालये होती. इमारतीच्या मागील बाजूस असलेला कचऱ्याचा मोठा ढिगारा अचानक घसरून इमारतीवर कोसळल्याने संपूर्ण संरचना हादरली आणि इमारतीचा मोठा भाग कोसळला.

दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल, महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे, मात्र पहिल्या मजल्यावर सुमारे १४ कर्मचारी अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बचावकार्य अधिक वेगाने सुरू असून प्रत्येक मिनिट महत्त्वाचे ठरत आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. जेसीबी आणि इतर अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने इमारतीवर कोसळलेला कचऱ्याचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे.

या दुर्घटनेचे नेमके कारण आणि किती जण अडकले आहेत, याबाबत अधिकृत माहिती बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

‘अभी नहीं तो कभी नहीं!’… आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत वाल्मिकी समाजाची ऐतिहासिक गर्जना

पावसाच्या ‘हाय अलर्ट’ला झुगारून ३६ जिल्ह्यांतील बांधव आझाद मैदानावर एकवटले; मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आंदोलनाची सकारात्मक दखल

मुंबई (विशेष प्रतिनिधी):

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू करावे, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्रातील वाल्मिकी-मेहतर समाजाने ६ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर ऐतिहासिक आणि धगधगते लाक्षणिक आंदोलन केले. मुंबईतील पावसाचा ‘हाय अलर्ट’ आणि मुसळधार पाऊस या कशाचीही परवा न करता, महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील विविध सामाजिक संस्था, सफाई कर्मचारी संघटनांचे राष्ट्रीय व प्रादेशिक प्रतिनिधी आणि हजारो समाजबांधव या आंदोलनात ‘शेरासारखे’ कडाडले.

उपेक्षित वाल्मिकी समाजाचा ७० वर्षांनंतर एल्गार

बावनी पंचायत आणि मेहतर वाल्मिकी समाज आरक्षण उपवर्गीकरण कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ दुर्लक्षित, उपेक्षित आणि वंचित राहिलेल्या या समाजाने आपल्या उज्वल भविष्यासाठी सर्व मतभेद, मान-सन्मान आणि अहंकार बाजूला ठेवून एकत्र येण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला.

१९७५ मध्ये पंजाबमधून सुरू झालेल्या आणि १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाने शिक्कामोर्तब झालेल्या ‘आरक्षण उपवर्गीकरणाची’ अंमलबजावणी व्हावी, हा या आंदोलनाचा मुख्य हेतू होता.

“Mehtar is untouchable everywhere” (मेहतर हा सर्वत्र अस्पृश्य आहे)

१९४८ च्या संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाच्या अत्यंत भीषण सामाजिक परिस्थितीची नोंद केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निर्णयात ‘भंगी/मेहतर समाज हा सर्वात जास्त उत्पिडित (Oppressed) आहे’ असे स्पष्ट नमूद केले आहे. याच ऐतिहासिक नोंदीचा आधार घेत, समाजाला न्याय मिळावा अशी मागणी आंदोलकांनी केली.

धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान

मुघल काळापासून ते स्वातंत्र्यापर्यंत आणि स्वातंत्र्यानंतरही अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करून, अत्याचार सहन करूनही या समाजाने कधीही आपला धर्म सोडला नाही. जळगावचे मेहतर समाजाचे पहिले आमदार स्व. भगवानजी बुधाजी कंडारे यांनी १९५२-५७ च्या काळात धर्म परिवर्तनाच्या लाटेतही हिंदू परिषद भरवून संस्कृती टिकवून ठेवली. जनसेवा आणि लोकआरोग्याची अविरत सेवा करणाऱ्या या समाजाने आज आपल्या हक्कासाठी ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे!’ आणि ‘अभी नही तो कभी नही!’ अशा गगनभेदी घोषणांनी आझाद मैदान दणाणून सोडले.

महायुती सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद

राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक आंदोलनाची त्वरित दखल घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी आझाद मैदानावर थेट आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.

या आंदोलनात राज्यातील वाल्मिकी मेहतर समाजाचे एकमेव आमदार श्री. श्यामभाऊ खोडे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली, तर आमदार अमित गोरखे यांनी योग्य मार्गदर्शन केले. आंदोलनाचे संपूर्ण आणि नेटके सूत्रसंचालन राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार विजेते युवा नेते श्री. नागेश कंडारे यांनी केले.

‘पुढच्या पिढीचे भविष्य उज्वल होणार’ – डॉ. रेखा बहनवाल कृती समितीच्या राज्य उपाध्यक्ष डॉ. रेखा गोपालसिंह बहनवाल यांनी आंदोलनानंतर सांगितले की,

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच वाल्मिकी आणि मातंग समाजाला आरक्षणाचा लाभ न मिळाल्याबद्दल स्पष्ट मत मांडले होते. आता सरकारने विचार मांडण्याची संधी दिली आहे. ‘आता एकत्र आलो नाही, तर पुन्हा अंधारात चाचपडत राहू’ या भावनेने समाज रस्त्यावर उतरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकार आम्हाला नक्कीच योग्य न्याय देईल आणि आमच्या पुढच्या पिढीच्या प्रगतीचे दरवाजे उघडतील, हा दृढ विश्वास घेऊनच समाजबांधवांनी आझाद मैदान सोडले आहे.”

देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान; आज पिंपरी-चिंचवड शहरात आगमन, स्वागताची जय्यत तयारी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याला काल (७ जुलै) देहू येथून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. पहिल्या दिवसाचा पारंपरिक मुक्काम देहूतील इनामदार वाड्यात झाल्यानंतर आज (८ जुलै) पालखी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार असून, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे.

काल पहाटेपासून देहूनगरीत हजारो वारकरी, दिंड्या आणि भाविकांची उपस्थिती होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, युवराज संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती तसेच खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते वेदमंत्रोच्चारात पादुकांचे महापूजन व कलशपूजन करण्यात आले. त्यानंतर “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिका वरदे हरी विठ्ठल” आणि “रामकृष्ण हरी”च्या जयघोषात पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.

मुसळधार पावसामुळे काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पालखी सोहळ्याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र प्रस्थानाच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने सर्व धार्मिक विधी निर्विघ्नपणे पार पडले. रिमझिम सरी, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि इंद्रायणीच्या तीरावर उसळलेला भक्तीचा उत्साह यामुळे संपूर्ण देहूनगरी भक्तिमय वातावरणाने भारावून गेली.

आज पालखीचे पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होत असून आकुर्डी येथे मुक्काम होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था, दिंडी मंडळे आणि वारकरी संघटनांकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. पालखी मार्गावर स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था तसेच वारकऱ्यांसाठी विविध सेवांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

शहरातील विविध चौक, रस्ते आणि पालखी मार्ग भगवे ध्वज, स्वागत कमानी आणि आकर्षक सजावटीने नटले असून वारकऱ्यांच्या स्वागतासाठी नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आज पिंपरी-चिंचवड शहर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून जाणार आहे.

जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज..

महापालिकेकडून जय्यत तयारी; सोहळ्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध

आषाढीवारी निमित्त अवघे वातावरण भक्तीमय झाले असतानाच, वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड उद्योगनगरी पूर्णपणे सज्ज झाली असून महापालिकेने सर्व तयारी पूर्ण केली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शहरात अत्यंत उत्साहात स्वागत केले जाणार आहे. महापालिकेकडून वारकऱ्यांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यंदा बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शहरात आगमन होणार असून या पालखीचा शहरात मुक्काम देखील होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी, गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजता आळंदी-दिघी रोडवरील मॅगेझीन चौक, भोसरी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन होईल. या दोन्ही ऐतिहासिक सोहळ्यांच्या स्वागतासाठी महापालिकेने मुख्य प्रवेशद्वारांवर सुसज्ज व आकर्षक स्वागत मंडप उभारले असून मुक्कामाच्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तयारीचा आढावा घेतला. आकुर्डी येथे मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू विद्यालय आणि वसंतदादा पाटील विद्यालय या शाळांमध्ये दिंड्यांचा मुक्काम असतो. या ठिकाणी महापौर आणि आयुक्तांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, स्नानगृहे आणि परिसरातील स्वच्छता या बाबींसह वीज पुरवठा आणि आवश्यक सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.  पालखी सोहळ्यामध्ये पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. 

महापालिकेकडून आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी,अखंडित पाणीपुरवठा आणि आवश्यक फिरती शौचालये, वैद्यकीय सुविधा, स्नानगृहे यांसारख्या मूलभूत सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध राहतील याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

सध्या शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने प्रशासनाने नागरिकांना आणि भाविकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, तसेच गर्दी आणि पावसाचे वातावरण पाहता, पालखी दर्शनासाठी येणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत बोलताना महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, पालखी सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी महापालिकेने प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती केली असून पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्था चोख ठेवत संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. शिवाय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी इंसिडंट कमांडर देखील नेमण्यात आले आहेत.

पालखी सोहळा म्हणजे विश्वबंधुता आणि मानवी कल्याणाची बीजे रोवणाऱ्या संतांच्या विचारांचा जागर

महापौर रवी लांडगे यांनी स्वागतपर भावना व्यक्त करताना सांगितले की, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे शहरात आगमन होत आहे, हा आपल्या उद्योगनगरीसाठी अत्यंत आनंदाचा क्षण असून महापालिकेकडून आणि पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने सर्व वारकरी भाविकांचे भावपूर्ण स्वागतासाठी शहर आतुर आहे. या सोहळ्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कोणतीही कमतरता राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. पालखी मार्ग आणि पालखी मुक्कामाच्या ठिकाणी महापालिका यंत्रणा कार्यरत राहणार आहे. पावसाच्या दृष्टीने नागरिकांनी देखील आवश्यक काळजी घेऊन या सोहळ्यात सहभागी व्हावे. संतांनी विश्वबंधुता आणि मानवी कल्याणाचा विचार जगाला दिला आहे. संतांच्या विचारांचा जागर पालखी सोहळ्यानिमित होत असतो. आपण देखील संत विचार जोपासण्यासाठी कटिबद्ध होऊया, अशा भावना महापौरांनी व्यक्त केल्या.