मराठी सिनेमांना थिएटरमध्ये स्क्रिन नं मिळणं हा मुद्दा नवीन नसला तरी ताकदीच्या सिनेमांनाही आता स्क्रिन न मिळाल्यानं पुन्हा एकदा संताप व्यक्त होत आहे. असा अनुभव राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे यांच्या बहुचर्चित टीडीएम सिनेमाला येत आहे. त्यामुळे भाऊराव कऱ्हाडे यांनी या सिनेमा संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना कळवला आहे.
भाऊराव कऱ्हाडे यांनी ख्वाडा, बबन यासारख्या अस्सल गावरान ढंगातील, रंगातील सिनेमा प्रेक्षकांसमोर आणत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला टीडीएम सिनेमा खूपच चर्चेत आला आहे. टीडीएम सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकताहोती. हा सिनेमा २८ एप्रिला प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. परंतु त्यानंतर या सिनेमाला स्क्रिन मिळत नसल्याचं समोर आलं आहे. हा सिनेमा पाहता येत नसल्यानं प्रेक्षकांची घोर निराशा झाली आहे. सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक भाऊराव तसंच अन्य कलाकारांनी यासंदर्भात खंत व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाऊराव यांनी टीडीएम सिनेमा संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.
भाऊराव कऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी सांगितलं की,’आगामी काळात माझ्या टीडीए सिनेमाचे शो मागं घेत आहे.’ इतकंच नाही तर निर्मात्यांनी एक प्रसिद्धीपत्रकही जाहीर केलं आहे. ही नोट भाऊराव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यात लिहिलं आहे की, ‘रसिक प्रेक्षकहो नमस्कार, मला माहिती आहे तुम्हाला ‘टीडीएम’ सिनेमा थिएटरमध्ये बघायची इच्छा आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मी ‘टीडीएम’चे प्रदर्शन तूर्तास थांबवत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील प्रदर्शनाचे अपडेट्स लवकरात लवकर देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
तुम्ही करत असलेल्या सहकार्यासाठी सर्वांचे मन:पूर्वक आभार! अशा शब्दांत दिग्दर्शक कऱ्हाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.