Monday, July 15, 2024
Homeताजी बातमीअ‍ॅपलच्या प्लँटमध्ये टाटा करणार पाच हजार कोटींची गुंतवणूक

अ‍ॅपलच्या प्लँटमध्ये टाटा करणार पाच हजार कोटींची गुंतवणूक

२८ ऑक्टोबर २०२०,
अ‍ॅपलनं आपल्या मोबाईल फोनची निर्मिती भारतात करण्यास सुरूवात केली आहे. तामिळनाडूच्या होसूरमधील औद्योगिक संकुलामध्ये अ‍ॅपलसाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी टाटा समूह ५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स या नव्या कंपनीला तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाकडून ५०० एकर जागा देण्यात आली असून मंगळवारी भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान, ही गुंतवणूक अन्य घटकांवरही अवलंबून असणार असून ती ८ हजार कोटी रूपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. द हिंदू बिझनेस लाईननं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

टाटा समूहाने किंवा तमिळनाडू सरकारपैकी कोणीही या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. परंतु या प्रकल्पात अॅपलसाठी आवश्यक असलेल्या सुट्या भागांची निर्मिती केली जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. फॉक्सकॉन यापूर्वीपासून भारतात आयफोन ११ सहित अन्य मोबाईल फोन्सची निर्मिती करत आहे. टायटन इंजिनिअरिंग अँड ऑटोमेशन लिमिटेडद्वारे (TEAL) या प्रकल्पाला तांत्रिक मदत पुरवली जाणार आहे. या प्रकल्पात ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकूण १८ हजार कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यात येणार आहे. तसंच यापैकी ९० टक्के महिला कर्मचारी असतील अशीही माहिती समोर आली आहे. टाटा समूह केंद्र सरकारच्या उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजनेचा लाभ घेत असल्याचं दिसून येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प मिळविण्यासाठी काही राज्यांमध्ये जोरदार स्पर्धा होती. अखेर तामिळनाडूने या करारावर स्वाक्षरी करत बाजी मारली. तामिळनाडूत व्यवसायासाठी असलेलं अनुकूल धोरण आणि फॉक्सकॉन, फ्लेक्स, सॅमसंग, डेल, नोकिया, मोटोरोला आणि बीवायडी यांसारख्या कंपन्यांची उपस्थिती राज्याच्या फायद्याची ठरल्याचं म्हटलं जात आहे. याव्यतिरिक्त विस्ट्रोन आणि पेगाट्रॉन यांच्यासह इतर आघाडीचे उत्पादक राज्यात गुंतवणूक करण्याच्या विचारात असून ते दीर्घकाळापर्यंत चीनला पर्याय बनू शकतील अशीही माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने नुकतीच तामिळनाडू इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी २०२० जाहीर केली आणि २०२५ पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे उत्पादन १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलं आहे. २०२५ पर्यंत भारताच्या एकूण इलेक्ट्रॉनिक निर्यातीत तामिळनाडूचा २५ टक्के वाटा असेल असंही म्हटलं जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments