जगभरातील क्रिकेट चाहते टी-२० लीग क्रिकेटमधील ज्या उत्सवाची वाट पाहत असतात तो आयपीएलचा उत्सव आजपासून (२६ मार्च) सुरू होत आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामातील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार असून दोन्ही संघाचे नेतृत्व नवे कर्णधार करणार आहेत. धोनीच्या नेतृत्वाचा महान वारसा जडेजाकडे आलाय. तर दिल्लीकडून केकेआरमध्ये आलेल्या श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
आयपीएल २०२२ साठी कडक बायो बबलची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व लढती महाराष्ट्रात होणार असून यात मुंबईतील ३ आणि पुण्यातील १ मैदानाचा समावेश आहे. २६ मार्च रोजी होणारी हंगामातील पहिली लढत मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल.चेन्नईची कोलकाताविरुद्धची कामगिरी १७-८ अशी आहे. दोघांमधील पहिली लढत रात्री साडे सात वाजता होणार आहे. यासाठीचा टॉस सात वाजता होईल.
दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील आयपीएलचे अधिकार स्टार नेटवर्ककडे आहेत. स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स १ एचडीवर या सामन्याचे लाईव्ह प्रसारण पाहता येईल. या सोबत डिस्ने हॉटस्टार लाईव्ह स्ट्रीमिंगवर सामना पाहता येतील. तर महाराष्ट्र टाईम्स डॉट.कॉमवर देखील लाईव्ह अपडेट आणि लाईव्ह स्कोअरकार्ड पाहता येईल.
चेन्नईने आतापर्यंत चार वेळा तर कोलकाताने दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये चेन्नईने अंतिम सामन्यात कोलकाताचा पराभव करून चौथे विजेतेपद मिळवले होते. या वर्षी स्पर्धा सुरू होण्याआधी चेन्नईचा कर्णधार धोनीने नेतृत्वपदाची धुरा ऑलराउंडर रविंद्र जडेजाकडे सोपवली आहे. कोलकाताने देखील नवा कर्णधार नियुक्त केला आहे. त्यामुळे पहिल्या लढतीत दोन नव्या कर्णधारांच्या नेतृत्वाची परीक्षा होणार आहे.