२० जानेवारी २०२०,
मावळ पंचक्रोशीत पत्रकारिता करणारे, एमपीसी न्यूजचे पत्रकार प्रभाकर तुमकर यांना वैद्यकीय उपचारासाठी तळेगाव शहर पत्रकार संघातर्फे 10 हजार रुपयांची मदत देण्यात आली. काही महिन्यांपूर्वी वराळे येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेले असताना त्यांना अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. अपघातामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती तसेच औषधोपचाराचा खर्च देखील खूप झाला होता.त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत तळेगाव शहर पत्रकार संघाने पुढे होऊन लागलीच तातडीची वैद्यकीय मदत म्हणून 10 हजार रुपयांचा धनादेश तुमकर यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आला. पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष सुनील वाळूंज, नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर दाभाडे, प्रकल्प प्रमुख ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी सचिव अतुल पवार, प्रकल्प प्रमुख सोनबा गोपाळे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तात्यासाहेब धांडे, खजिनदार बी.एम.भसे उपस्थित होते. ही मदत करीत असताना पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी कोणतीही प्रसिद्धी केली नाही. या मदतीबद्दल प्रभाकर तुमकर यांनी तळेगाव शहर पत्रकार संघाचे आभार मानले.
नि:स्वार्थी भूमिकेने आणि सामाजिक जाणिवेने केलेले कार्य लोकांच्या मनावर कोरले जाते आणि तेच खरे तर चिरंतन स्मरणात राहते अशी भावना तुमकर यांनी व्यक्त केली.