Monday, April 22, 2024
Homeक्रिडाविश्व११ व्या वरिष्ठ गट हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजयात तालेबचा कर्णधाराला साजेसा खेळ

११ व्या वरिष्ठ गट हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजयात तालेबचा कर्णधाराला साजेसा खेळ

कर्णधारपदाच्या जबाबदारीस साजेसा खेळ करत तालेब शाहने सलग दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. पहिल्या सामन्यात आठ गोल करणाऱ्या तालेबने आज तीन गोल करत महाराष्ट्राला ११ व्या वरिष्ठ गट हॉकी स्पर्धेत छत्तीसगड संघावर ९-२ असा विजय मिळवून दिला. महाराष्ट्राचा हा दुसरा विजय होता. महाराष्ट्राप्रमाणेच बिहार आणि उत्तर प्रदेश संघांनी देखिल दुसऱ्या विजयाची नोंद करून बाद फेरीच्या दृष्टिने मोठे भक्कम पाऊल टाकले.

महाराष्ट्राच्याच गटात बिहारनेही दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी मिझोरामचा ४-० असा पराभव केला. सहा गुणांसह दोन्ही संघ या गटात आघाडीवर राहिले आहेत. आता यो दोघांच्यात गुरुवारी लढत होणार असून, यातील विजेता संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहे. गोल सरासरीवर महाराष्ट्राची आघाडी असून, त्यांची +25, तर बिहारची +6 अशी गोल सरासरी राहिली आहे.

कर्णधार तालेब शाह महाराष्ट्राच्या विजयाचा शिल्पकार होता. त्याने चौथ्या, ३०व्या, ५५व्या मिनिटाला गोल केला. त्याला प्रताप शिंदे आणि मोहंमद निजामुद्दिन यांनी प्रत्येकी दोन गोल करून सुरेख साथ केली. मात्र, या आक्रमक खेळ करण्याच्या नादात त्यांचे बचावाकडे दुर्लक्ष झाले आणि त्यांना दोन गोल स्वीकारावे लागले. महाराष्ट्रासाठी वेंकटेश केंटे आणि टिकाराम ठकुला यांनी अन्य गोल केले. छत्तीसगडकडून कार्तिक यादव आणि जुनेद अहमद यांनी गोल केले.

सी गटात सलग दुसरा विजय मिळवितान उत्तर प्रदेशाने झारखंडला ३-० असे पराभूत केले. ओडिशाने एफ गटातील चुरशीच्या सामन्यात पश्चिम बंगालला बरोबरीत रोखले. आता या गटातून हे दोन्ही संघ ४ गुणांसह बरोबरीतच आहे. त्यामुळे आता या दोघांमधील सामन्यालाही बाद फेरी गाठण्याच्या दृष्टिने महत्व येणार आहे.

स्पर्धेच्या तीन दिवस गोलांचा पाऊस पडत असताना आजच्या चौथ्या दिवसाची सुरवात बरोबरीने झाली. पूर्वार्धात ३-० असे पिछाडीवर राहिलेल्या बंगालने उत्तरार्धात आपला खेळ उंचावून जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. त्यांनी तीन गोल करून सामना बरोबरीत सोडवला. एफ गटातील अन्य एका सामन्यात वेगवान खेळाचे प्रदर्शन झाले. गुजरातने मध्यंतराच्या ३-१ अशा आघाडीनंतर गोव्याचा ४-३ असा पराभव केला. जी गटातील सामन्यात उत्तर प्रदेश संधाने वर्चस्व राखत झारखंडवर ३-० असा पराभव केला. फराझ मोहंमदने चौथ्याच मिनिटाला कॉर्नवर गोल केल्यावर अजयने पूर्वार्ध आणि उत्तर्रार्धात एकेक गोल करत उत्तर प्रदेशाचा विजय साकारला. याच गटात केरळाने आसामविरुद्ध २-१ अशी मात केली.

तमिळनाडूचा मोठा विजय…

अ गटातील सामन्यात तमिळनाडूने तेलंगणावर ७-० असा विजय मिळविला. आजच्या दिवसातील हा सर्वात मोटा विजय होता. तमिळनाडूच्या विजयात कार्तिने तीन गोल करून विजयात महत्वाची भूमिका बजावली. सुंदरापंडी, मारीस्वरन, सिल्वर स्टॅलिन यांनीही गोल करून संघाच्या विजयात आपला वाटा उचलला. तमिळनाडूचा हा स्पर्धेतील पहिला विजय होता. आता बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना अखेरच्या सामन्यात हिमाचल प्रदेशाविरुद्ध असाच खेळ करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments