लहान मुलं खेळता खेळता कधी काय करतील सांगू शकत नाही. सेल, बटण, नाणी अशा काही ना काही वस्तू मुलांनी गिळल्याची बरीच प्रकरणं आहेत. आता असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. एका तीन वर्षांच्या मुलाने दोन रुपयांचं नाणं गिळलं. त्याच्या आईचं लक्ष जाईपर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर झाली. संभाजीनगरमधील ही घटना आहे.
सिल्लोड तालुक्यातील पावनडोद बुद्रुक इथं राहणारा 3 वर्षांचा पवन वराडे, सकाळच्या वेळेस घरातच खेळत होता. त्याची आई घरातली कामं करण्यात व्यस्त होती. त्याचवेळी आईची नजर चुकवून त्याने दोन रुपयांचं नाणं तोंडात धरलं. ते नाणं तोंडातून सरकलं आणि त्याच्याकडून गिळलं गेलं. नाणं घशात अडकलं. तो ते काढण्याचा प्रयत्न करत होता. पण ते आणखी खोल गेलं.
मुलाचं विचित्र वागणं पाहून आईही घाबरली. आपल्या मुलाच्या घशात नाणं गेल्याचं तिला तेव्हा समजलं. ती खूप घाबरली. तिने लगेच आपल्या नवऱ्याला, शेजाऱ्यांनाही बोलावून घेतलं. सर्वांनी प्रयत्न केले. पण मुलाच्या घशातील नाणं काही बाहेर पडेना. अखेर त्याला पावनडोद बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याला घाटी रुग्णालयात हलवायला सांगितलं.
मुलाला आता घाटी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. त्याचे एक्स-रे वगैरे रिपोर्ट काढले असून पुढील उपचार सुरू आहेत.
एखाद्याच्या घशात काही अडकल्यास काय करायचं?
तुमच्यासमोर एखाद्या व्यक्तीच्या घशात काही अडकल्यास त्या व्यक्तीच्या कंबरेवर जोरजोरात मारा. त्यामुळेही आराम पडला नाही, तर त्या व्यक्तीला पुढे झुकण्यास सांगून तोंड खाली करण्यास सांगावं. आपला एक हात त्या व्यक्तीच्या छातीवर ठेवून दुसऱ्या हातानं कंबरेवर जोरजोरात मारावं. यामुळे अडकलेला पदार्थ तोंडातून बाहेर येईल.
करूनही उपयोग झाला नाही, तर प्रौढ व्यक्ती असेल तर तिचं पोट जोरजोरात दाबावं. त्यासाठी त्या व्यक्तीच्या मागे उभे राहा. त्या व्यक्तीच्या कंबरेभोवती हात गुंडाळून तिला पुढे झुकण्यास सांगा. बेंबीच्या वर एका हाताची मूठ करून दुसरा हात त्यावर ठेवा. मग त्या व्यक्तीला वर उचला. ही क्रिया 5 वेळा करा. यामुळे पदार्थ बाहेर येण्यास मदत होईल. गरोदर स्त्रिया व एक वर्षाच्या मुलांवर याचा प्रयोग करू नये. असं करूनही घसा मोकळा झाला नाही, तर तातडीनं जवळच्या रुग्णालयात न्यावं.
लहान मुलांच्या घशात काही अडकलं असेल, तर पहिल्यांदा मुलांना तोंड उघडण्यास सांगावं. तो पदार्थ दिसत असेल, तर बोट घालून काढण्याचा प्रयत्न करावा. मात्र दिसत नसेल, तर तसं अजिबात करू नये. त्यामुळे ती वस्तू आणखी आत जाऊ शकते. मुलाला लगेचच रुग्णालयात घेऊन जावं. मुलांच्या घशात अनावधानानं काही पदार्थ अडकू शकतात. त्यावेळी लगेचच प्राथमिक उपाय केले, तर परिस्थिती गंभीर होण्यापासून रोखता येते.