Tuesday, April 21, 2026
Homeउद्योगजगतपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागात संशयास्पद खरेदी व्यवहार; माहीती देण्यास टाळाटाळ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागात संशयास्पद खरेदी व्यवहार; माहीती देण्यास टाळाटाळ

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभागातील खरेदी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विविध साहित्य खरेदीत नियमबाह्य पद्धती वापरल्याचा आणि लाखो रुपयांच्या व्यवहारात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनाच्या पारदर्शकतेबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडार विभागाने अलीकडेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया राबवली होती. मात्र, या प्रक्रियेत स्पर्धात्मकतेचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. काही ठराविक पुरवठादारांनाच कामे देण्यासाठी अटी व निकष तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. परिणामी, बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करून आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

माहीतीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सुरुवातीला अपुरी माहिती देण्यात आली. अधिक तपशील विचारल्यावर “वरिष्ठांची परवानगी घ्या” असे सांगत अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचे टाळले. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असूनही ती न देण्याची भूमिका घेतल्याने संशय अधिकच बळावला आहे.

या प्रकरणात किंमती फुगवून दाखवणे, ठराविक कंपन्यांना लाभ देणे आणि प्रक्रियेत पारदर्शकता न ठेवणे अशा बाबींची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.

नागरिकांच्या करातून जमा होणारा निधी अशा प्रकारे खर्च होत असल्यास ही गंभीर बाब असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे. तसेच, संपूर्ण खरेदी प्रक्रियेचा तपशील सार्वजनिक करून प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी होत आहे.

दरम्यान, शहर “स्मार्ट सिटी”च्या दिशेने वाटचाल करत असताना अशा प्रकारचे आरोप समोर येणे प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यावरच आता नागरिकांचा विश्वास टिकून आहे.

‘माहिती देण्यास टाळाटाळ; संशय गडद’

एखादा व्यवहार नियमांनुसार आणि पारदर्शक असेल, तर माहिती देण्यात अडचण येत नाही. मात्र, या प्रकरणात वारंवार माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने “काहीतरी लपवले जात आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रकरणातील संशय अधिकच गडद झाला असून, सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments