पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी उमेदवार सुप्रियाताई चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्षा भालेराव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निता चव्हाण यांचे उमेदवारी अर्ज दाखल होते.
मात्र अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा भालेराव आणि मनसेच्या गिता चव्हाण यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुप्रियाताई चांदगुडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
विशेष म्हणजे शहरात भाजपाचा हा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. या यशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे चित्र दिसत आहे.
या बिनविरोध विजयाबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांकडून सुप्रियाताई चांदगुडे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.


